
‘महाराष्ट्रातील क्रीडापटूंचे ऑस्कर’ असा लौकिक असला तरी राज्य शासनाच्या ढिसाळ आणि गचाळ कारभारामुळे सदैव रखडणारा आणि उरकाउरकीचा झालेल्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा’च्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पुरस्काराच्या वितरणाला गुड फ्रायडेचा मुहूर्त मिळाला आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते येत्या 18 एप्रिलला पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच आम्ही अधिकृत तारीख जाहीर करू, अशी माहिती राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.
दिवसेंदिवस महाराष्ट्रातील क्रीडापटूंचा जागतिक स्तरावर दबदबा वाढत चालला आहे. या खेळाडूंना राज्य शासनाकडून कोटींची बक्षिसे जाहीर केली जात आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान यश संपादणाऱ्या खेळाडूंची राज्य पुरस्कारांसाठी निवड करताना नेहमीच सावळागोंधळ आणि वशिलेबाजी होत असल्याचे वारंवार उघडकीस येत आहे. त्यामुळे राज्य क्रीडा पुरस्कार आणि वाद यांचे जिव्हाळय़ाचे नाते झाल्यामुळे या पुरस्कारांची घोषणा आणि वितरण दरवर्षी होणे कठीण बनले आहे. त्यामुळे गेले काही वर्षे हा पुरस्कार सोहळा दर तीन-चार वर्षांनीच उरकण्याची नामुष्की राज्य क्रीडा खात्यावर ओढावत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळय़ात हा पुरस्कार शिवजयंती दिनीच होणार असल्याचे छातीठोकपणे जाहीर करण्यात आले होते, मात्र क्रीडा खात्याला नेहमीप्रमाणे तो योग साधता आला नव्हता. गेल्या वर्षी न होऊ शकलेला आणि यंदाही शिवजयंतीचा मुहूर्त हुकलेल्या या पुरस्कारासाठी गुड फ्रायडेचा 18 एप्रिलचा मुहूर्त साधला जाणार आहे. राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची पुरस्कार वितरणासाठी बालेवाडी क्रीडानगरीत लगीनघाई सुरू झाली आहे. पुरस्कारार्थी खेळाडूंना अद्यापि या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती नाही. मात्र सर्व मान्यवरांकडून 18 एप्रिल या तारखेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ वितरण सोहळय़ाच्या तारखेवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ आणि ‘वाद’ हे समीकरण महाराष्ट्रासाठी काही नवे नाही. राज्य क्रीडा पुरस्कारांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी राज्याच्या क्रीडा खात्याने गतवर्षीच्या जानेवारीमध्ये अश्वारोहण, गोल्फ, नौकानयन, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम व बिलियर्ड्स अॅण्ड स्नूकर या सात खेळांना पुरस्कार धोरणांतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोठा गदारोळ झाला. संबंधित क्रीडा संघटना व खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात गेला. उच्च न्यायालयाने खेळाडूंना दिलासा देणारा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य क्रीडा मंत्रालयाकडून वगळलेल्या त्या सात खेळांचा पुन्हा राज्य क्रीडा पुरस्कार धोरणात समावेश करण्यात आला. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे गतवर्षी पुरस्कार वितरणाला मुहूर्त मिळाला नाही. त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणूक, सरकार बनविणे आणि खातेवाटप या चर्चेच्या गुऱहाळात या वर्षीदेखील नव्या सरकारला ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ वितरणासाठी 19 फेब्रुवारीचा मुहूर्त साधता आला नव्हता. तो आता गुड फ्रायडेला होईल.
‘शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर आमची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या पुरस्कार सोहळय़ासाठी आम्ही शासनाकडे 18 एप्रिलपर्यंतची तारीख मागितलेली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पुरस्कार वितरण कार्यक्रमाची तारीख जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर आम्ही पुरस्कार वितरण सोहळय़ाची अधिपृत तारीख जाहीर करू.’ – सुधीर मोरे, सहसंचालक,