
हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराचा महागडा खर्च परवडणारा नव्हता. अशा वेळी शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी या रुग्णाच्या मदतीसाठी धावले असून त्यांनी स्वतःच्या पैशांतून या रुग्णाचा पुढील सहा महिन्यांचा औषधोपचारांचा खर्च भागवला आहे.
घाटकोपर पंतनगर येथे राहणारे शिवाजी देवघरे (77) हृदयविकाराने ग्रस्त आहेत. उपचारासाठी मदत मिळावी यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले. हे पत्र शिवसेना सचिव पराग डाके यांनी शिव आरोग्य सेनेकडे सुपूर्द केले. शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांनी शिवाजी देवघरे यांच्याशी संपर्क साधत त्यांची वैद्यकीय परिस्थिती जाणून घेतली.
शिवाजी देवघरे यांना तीन वेळा हृदयविकाराचे झटके आले असून त्यांच्या हृदयाला तीन ब्लॉकेज आहेत. वयोमानानुसार त्यांचे ऑपरेशन करणे शक्य नाही. त्यानंतर शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्याशी चर्चा करून जितेंद्र सकपाळ यांनी आरोग्य सेनेचे मानखुर्द समन्वयक डॉ. आनंद बाबर यांना सदर रुग्णाची भेट घेण्याच्या सूचना दिल्या.
डॉ. आनंद बाबर यांनी रुग्णाची भेट घेत पूर्ण वैद्यकीय कागदपत्रे तपासली. सध्या देवघरे यांच्यावर घाटकोपर येथील माधवबाग डॉ. विद्याज हेल्थकेअर सेंटर येथे उपचार सुरू असून महिन्याच्या औषधांचा खर्च खूप येतो. इतके पैसे खर्च करण्याची त्यांची ऐपत नाही. शिव आरोग्य सेनेच्या विनंतीनंतर डॉ. विद्या बुद्धे यांनी काही प्रमाणात सवलत देण्याचे मान्य केले.
शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ, मानखुर्द विधानसभा समन्वयक डॉ. आनंद बाबर, ठाणे संपर्क समन्वयक प्रशांत भुइंबर, ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे, डॉ. रेखा पी. भुइंबर, कांदिवली विधानसभा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संतोष भानुशाली, सचिव डॉ. धनंजय दढेकर यांनी स्वतःची पदरमोड करत पुढील सहा महिन्यांचे औषधोपचाराचे पैसे डॉ. विद्या बुद्धे यांना दिले.
रुग्णाने मानले शिवसेनेचे आभार
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही पत्र पाठवून मी उपचारासाठी मदत मागितली होती, परंतु कोणीही माझ्या पत्राची साधी दखलदेखील घेतली नाही. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्राची दखल घेऊन माझ्या मदतीसाठी उभे राहिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, अशा भावना शिवाजी देवघरे यांनी व्यक्त केल्या.