गावाहून उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला शिव आरोग्य सेनेने मदतीचा हात दिला असून पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून या रुग्णाच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च उचलला. या पार्श्वभूमीवर रुग्णाने शिव आरोग्य सेनेचे आभार मानले आहेत.
महाडच्या चिंबवे गावच्या खाडी पट्टय़ात राहणाऱ्या ज्ञानदीप सुतार यांनी त्यांचे गावचे ग्रामस्थ गुरुनाथ सुतार यांना उपचारासाठी मुंबईत आणले होते. त्यांना एमआरआय, सिटी स्पॅन, एक्स रेसारख्या वैद्यकीय चाचण्या करायला सांगितल्या. पण त्या करण्यास ते असमर्थ होते. या पार्श्वभूमीवर ज्ञानदीप सुतार यांनी शिव आरोग्य सेनेकडे उपचारासाठी मदत मागितली. शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ तसेच उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षं राजावाडी रुग्णालयात समाजसेवेचे काम करणाऱ्या मुंबई सहसमन्वयक प्रकाश वाणी आणि सचिन भांगे यांनी स्वतः सर्व चाचण्यांचे पैसे भरून त्यांना सहकार्य केले. याकरिता गुरुनाथ सुतार यांनी शिव आरोग्य सेनेचे आभार मानले.