
लाखो रुपये खर्च करून मुलाच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यामुळे पालकांनी शिव आरोग्य सेनेकडे तक्रार दाखल केली. शिव आरोग्य सेनेच्या दणक्यानंतर डॉक्टरांनी एक लाख रुपयांचा धनादेश पालकांना दिला असून यापुढील शस्त्रक्रियेचा पूर्ण खर्च उचलण्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे पालकांनी शिव आरोग्य सेनेचे आभार मानले आहेत.
विक्रोळीत राहणाऱ्या तक्रारदार प्रवीण पेंगार यांचा सात वर्षीय मुलगा ईशान याच्यावर डॉ. क्रिस्तोफर डिसोझा यांनी 28 मार्चला ग्रॅण्ट रोडच्या भाटिया रुग्णालयात डाव्या कानावर कॅक्लियर इम्लांट ही शस्त्रक्रिया केली. त्यासाठी एक लाख रुपये फी आकारली, परंतु ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. ईशानच्या उजव्या कानावरही याच डॉक्टरांनी नोव्हेंबर 2020 मध्ये वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळीदेखील शस्त्रक्रियेत काही कॉम्प्लिकेशन्स झाल्या होत्या. त्यावेळीदेखील पालकांनी अडीच ते तीन लाख रुपये खर्च केला होता. त्यामुळे प्रवीण पेंगार यांनी शिव आरोग्य सेनेकडे तक्रार केली. शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ आणि टीमने होली फॅमिली रुग्णालयात जाऊन डॉ. क्रिस्तोफर डिसोझा यांना जाब विचारला. त्यावेळी डॉ. डिसोझा यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करत भरलेल्या एक लाख रुपयांचा धनादेश ताबडतोब पेंगर यांच्याकडे परत दिला. तसेच रुग्णाच्या पुढे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचा पूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्प समन्वयक अमोल वंजारे, मुंबई सचिव ज्योती भोसले, मुंबई जिल्हा सह समन्वयक प्रकाश वाणी, भायखळा विधानसभा आरोग्य सचिव रवींद्र बाचनकर, प्रभाग समन्वयक संदेश कोटेकर, संजय घोडके, घाटकोपर विधानसभा संघटक सचिन भांगे, हिंदुस्तान माथाडी जनरल कामगार सेनेचे लीतेश केरकर, बापूराव जावीर, चंद्रकांत हळदणकर उपस्थित होते.