
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाईचे राहुल बापुसाहेब पुंडे (वय 38 वर्षे) यांचे निधन झाले. त्याआधी 30 वर्षांपूर्वी आईचे निधन झाले, त्यानंतर 4 वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. वडील वयस्कर असून घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे संपूर्ण पुंडे कुटुंब उध्वस्त झाले आहे. राहुलला दोन मुले असून मुलगी स्वरा (वय 7) तर मुलगा अर्णव (वय 5) दोन्ही मुले निराधार झाली आहेत. आपण या मुलांसाठी काही तरी केलं पाहिजे, असा विचार संकट मोचक, समाज सेवक शहाजीराजे दळवी व आदर्श माजी सैनिक महाराष्ट्र पोलीस भरत आबाजी पुंडे यांच्या मनात आला. सविस्तर चर्चा करून “एक हात मदतीचा” हे आव्हान सोशल मीडियाद्वारे सर्व व्हाट्सअप ग्रुपवर करण्यात आले. देहूरोड पोलीस स्टेशन ग्रुपवरती सदरचे मदतीचे आवाहन भरत पुंडे यांनी केले.
देहूरोड पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस घटकातील अधिकारी, अंमलदार यांनी मोलाचे योगदान केले. 71 हजार रुपये रोख रक्कम या माध्यमातून जमा झाली. कान्हूर मेसाई परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार व शिरूर तालुक्यातील सर्व दानशूर मान्यवरांनी उदंड असा प्रतिसाद दिला. 1 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम जमा झाली. एकूण रक्कम दोन लाख 40 हजार रुपये दशक्रियेच्या दिवशी राहुल पुंडे यांची बहिण लता बाळासाहेब डफळ व बाळासाहेब श्रीपती डफळ यांच्याकडे मुलांच्या संगोपनासाठी कान्हूर मेसाई गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व नागरिक, पाहुणे मंडळी यांनी सुपूर्द मदत केली. सदर वेळी रक्कम स्विकारताना डफळ यांनी उपस्थितांचे व दानशुरांचे मनःपूर्वक आभार मानले व मुलांचे उत्तम प्रकारे संगोपन करेन, असे आश्वासन दिले. व्हाइस चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना प्रदीप वळसे पाटील आणि एडवोकेट देवराम धुमाळ यांनी दोन्ही मुलांची 12 वी पर्यंत शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
शहाजी बाळासाहेब दळवी यांनी “एक हात मदतीचा” हे 27 वे आवाहन केले होते. त्यांनी मागील 6 वर्षांपासून “एक हात मदतीचा” या उपक्रमातून 77 लाख रुपये गरजू व दुर्बल घटकांना कान्हूर व परिसरातील दात्यांच्या माध्यमातून मिळून दिले आहेत. “निस्वार्थी सेवा करणारा जनसेवक” म्हणजे शहाजी आण्णा आपला स्वार्थ अभिमान आहे. यावेळी आदर्श माजी सैनिक महाराष्ट्र पोलीस भरत आबाजी पुंडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे, दानशुरांचे आभार मानले.