
पूर्वी रात्री बाहेर फिरणारे बिबटे आता भरदिवसा भरवस्तीत फिरत असून, घरात घुसून माणसांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पिंपळे जगताप, तांबेवस्ती येथे घरात बसलेल्या तरुणीवर हल्ला करण्याचा बिबट्याचा प्रयत्न होता; मात्र पाळीव श्वानामुळे तिचा जीव वाचला. हा श्वान मात्र बिबट्याचा बळी ठरला. दुसऱ्या श्वानाने प्रतिकार केल्यामुळे बिबट्या पसार झाला.
मोनिका (21) असे बचावलेल्या तरुणीचे नाव आहे. ती राजेंद्र तांबे यांची भाची आहे. दोन महिन्यांची असताना आईचे निधन झाल्याने ती मामाकडे राहत होती. पिंपळे जगताप ग्रामपंचायत सदस्य दीपाली राजेंद्र तांबे यांच्या घरात हा प्रकार घडला. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. दीपाली राजेंद्र तांबे ह्या नातेवाईकांच्या पूजेसाठी गेल्या होत्या, तर त्यांचे सासरे दादासाहेब हे मित्राकडे गेले होते. 8 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता पिंपळे जगताप येथील तांबे कुटुंबांच्या दारात दोन श्वानांना बांधले होते, तर दरवाजा उघडाच होता. आतमध्ये मोनिका बसलेली होती. दबक्या पावलाने आलेल्या बिबट्याने दोन श्वानांवर हल्ला केला, यात एका श्वानाला घेऊन बिबट्या पळाला; परंतु प्रतिकारामुळे बिबट्या पसार झाला.बिबट्याच्या पाठीमागे दुसरे कुत्रे गेले.
बिबट्या घरात घुसला असता तर आपल्याही जीवाचे काही बरे वाईट झाले असते. श्वानांनी आपल्या जीवाची बाजी लावली. घराबाहेर रात्री येणारा बिबट्या पशुधनावर हल्ले करीत असे. आता घरातही घुसू लागला आहे. हे या घटनेवरून समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांनी स्वतःची काळजी आता स्वतः घेणे गरजेचे आहे, असे दीपाली राजेंद्र तांबे यांनी सांगितले. दीपाली तांबे ह्या नातेवाईकांच्या पूजेसाठी गेल्या होत्या, तर त्यांचे सासरे दादासाहेब हे मित्राकडे गेले होते, त्याच वेळेस त्यांच्या घरात त्यांची भाची व दोन मुली होत्या. त्याच वेळेस बिबट्याने हा हल्ला केला. यामुळे आमच्या मुलींचे प्राण वाचले; परंतु आमचा श्वान जीवाला मुकला आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी दीपाली तांबे यांनी केली.लहान मुले, शेतकरी, महिला, पुरुष यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून लवकरच या भागात वन खात्याने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांनी केली आहे. पोलीस पाटील वर्षा थिटे, वनपाल गौरी हिंगणे, वन्यजीव बचाव पथकाचे शेरखान शेख, शुभम वाघ, अमोल कुसाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.