![ganja](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ganja-696x447.jpg)
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आंबा गाव शिवारात पोलिसांनी तीन एकर क्षेत्रावरील गांजा शेती उद्ध्वस्त केली. दोन दिवसांच्या कारवाईत अकरा हजार किलो गांजा हस्तगत केला आहे.
महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर शिरपूर तालुक्यात आंबा हे गाव आहे. येथील शिवारात एकाने मका व दादरच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने शिरपूर तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या शेतात धाड टाकली. तब्बल तीन एकर शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळले. शनिवार व रविवार असे दोन दिवस गांजाची कापणी करण्यात आली. अकरा हजार किलो वजनाचा दोन कोटी वीस हजार रुपये पिंमतीचा गांजा जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.
वीस एकरवर लागवडीचा संशय
मध्य प्रदेश सीमेवर हे गाव असल्याने येथून मोठय़ा प्रमाणात सतत गांजा तस्करी होते. आंबा गावच्या या शिवारात वीस एकरहून अधिक क्षेत्रावर गांजाची लागवड असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती.