नगर जिह्यात महाविकास आघाडीने नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा दारुण पराभव केला. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. नगरमध्ये विखे-पाटील यांच्या सत्तेला मतदारांनी सुरुंग लावला, तर शिर्डीकरांनी गद्दारांना चांगलाच धडा शिकविला. नगरमध्ये राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांचा नीलेश लंके यांनी 29 हजार मतांनी पराभव केला, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सदाशिव लोखंडे यांचा 50 हजार मतांनी पराभव करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेब वाघचौरे यांनी दणदणीत विजय मिळविला. विजयानंतर उमेदवारांनी जल्लोष करीत ‘जय भवानी… जय शिवाजी’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
नगरच्या एमआयडीसी येथील औद्योगिक वसाहत येथे असणाऱया एमआयडीसीच्या गोदामामध्ये आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी काम पाहिले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नगर व शिर्डी मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान पार पडले होते. नगरमध्ये 66.78 टक्के, तर शिर्डीमध्ये 63.3 टक्के मतदान झाले होते. नगर लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर शिर्डीत 20 उमेदवारांमध्ये लढत होती. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये 19 लाख 81 हजार 866 मतदारांपैकी 12 लाख 63 हजार 781 जणांनी मतदान केले होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 16 लाख 77 हजार 335 मतदार होते. यांपैकी 10 लाख 57 हजार 298 जणांनी मतदान केले.
आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी 96 टेबलवर मतमोजणी झाली. प्रारंभी नगर मतदारसंघामध्ये पोस्टल मते मोजण्यात आली. मात्र, त्याचा निकाल देण्यात आला नव्हता. त्यामुळे उशिराने पहिली फेरी घेण्यात आली. अतिशय संथ गतीने मतमोजणी सुरू होती. पहिल्या टप्प्यामध्ये नगर मतदारसंघामध्ये भाजपचे सुजय विखे यांनी 9356 मते मिळवून आघाडी घेतली होती. ही आघाडी सहाव्या फेरीपर्यंत कायम होती. सातव्या फेरीला नीलेश लंके व विखे यांची बरोबरी झाली. त्यानंतर नीलेश लंके यांनी विखे यांना मिळालेले 10 हजार 215 मतांचे लीड तोडत 4025 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी 11व्या फेरीपर्यंत कायम होती. 11व्या फेरीअखेर लंके यांना 10 हजार 465 मते मिळाली. मतमोजणीच्या सातव्या फेरीपासून निकालाचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. या फेरीमध्ये सुजय विखे यांना 20 हजार 131, तर नीलेश लंके यांना 33 हजार 799 एवढी मते मिळाली. त्यानंतर जवळपास सगळ्याच फेऱयांमध्ये कमी-अधिक प्रमाणामध्ये लंके यांनी आघाडी कायम ठेवली. 21 व 22व्या फेरीमध्ये काही प्रमाणामध्ये विखे यांनी मताधिक्य मिळविले; पण त्याचा परिणाम लंके यांच्या मिळालेल्या आघाडीवर दिसून आलेला नाही.
नगर शहरातून विखे यांना फटका
मागील वेळेला नगर शहरातून सुजय विखे यांना सुमारे 54 हजार मते मिळाली होती. यंदा त्यांना रोखण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आले. त्यांना नगर शहरामध्ये 30 हजारांचे लीड मिळाले असले, तरी त्यांच्या या लीडला महाविकास आघाडीने ब्रेक लावल्यामुळे विखे यांना फटका बसला आहे. विखे यांना नगर शहर व राहुरी या दोन तालुक्यांतून मताधिक्य मिळाले. पारनेरमधून विखे यांना मताधिक्य मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, तो फोल ठरला.
विखे यांनी केला सत्तेचा वापर
नगर जिह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून मुलाच्या विजयासाठी नगर शहरात तळ ठोकला होता. वास्तविक पाहता, ‘स्टार प्रचारक’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली असतानादेखील त्यांना नगर लोकसभा मतदारसंघात अडकून पडावे लागले. अनेकांचा विरोध दिसून येत होता. त्यांनी तो विरोध हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्या अंगलटच आला, हे आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करून ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकता येईल, याची त्यांनी केलेली आखणी यशस्वी झाली नाही.
पारनेरने स्वाभिमान जपला
नीलेश लंके हे मूळचे पारनेर तालुक्यातील आहेत. त्यांनी विधानसभेची निवडणूक याच मतदारसंघातून लढविली होती. हा तालुका त्यांच्या पाठीशी कायम राहिला असून, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पारनेर तालुक्याने चांगल्या प्रकारचे मतदान केले. येथून प्रत्येक फेरीमध्ये त्यांना आघाडी देत पारनेरने स्वाभिमान जपला, असेच म्हणावे लागेल.
विखे यांनी आश्वासने पाळली नाहीत
नगर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने पहिल्यापासूनच एकसंध राहण्याचा निर्णय घेऊन विखेंचा पराभव करण्याचा निर्णय घेतलेला होता. विखेंनी गेल्या पाच वर्षांमध्ये नगरच्या जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, याचा फटका बसला.
भाऊसाहेब वाकचौरे यांना संगमनेर, अकोलेतून मोठे मताधिक्य
शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. 10व्या फेरीनंतर त्यांनी 20 हजार मतांची आघाडी घेतली होती. भाऊसाहेब वाकचौरे यांना संगमनेर व अकोले तालुक्यांतून मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळेच वाकचौरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. शिर्डीतून बहुजन वंचित आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांना 90 हजार 929 एवढी मते मिळाली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा माझ्या विजयात मोलाचा वाटा आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. तसेच शिर्डीतील जनता आणि शेतकरीवर्ग सातत्याने माझ्या पाठीशी उभा राहतो हे आजच्या विजयातून स्पष्ट झाले. या सर्वांचे मनापासून आभार. आगामी काळात शिर्डीच्या विकासासाठी अग्रभागी राहून काम करू, असा विश्वास खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला.
नगर लोकसभेची निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती. या निवडणुकीत सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्ग माझ्या पाठीशी ठाम राहिला. त्याचप्रमाणे शरद पवार साहेब यांच्यासह शिवसेना, काँगेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे माझा विजय सुकर झाला. मला मतदान केलेले आणि न केलेल्यांचा मी आभारी आहे. आता कोणाबाबत काही न बोलता जे काही आहे ते कामातून दाखवून देऊ, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
सामान्य नेतृत्व नीलेश लंके विजयी
नीलेश लंके यांनी दोन वर्षांपूर्वीच ‘मी खासदारकीची निवडणूक लढविणार,’ असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी ही निवडणूक लढविली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. लंके यांनी सर्व घटकांना बरोबर घेत प्रचाराची मोट बांधली. विशेष म्हणजे, आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी ही निवडणूक लढविली. त्यामुळे नगरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष होते. सर्वसामान्य असलेले नीलेश लंके हे आता नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आहेत.
अनिल राठोड यांची आठवण
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील यांना पराभूत करून मोठा विजय मिळविला. निकालानंतर माध्यमांशी बोलताना नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी स्व. अनिल राठोड यांची आवर्जून आठवण काढली. ‘आजच्या विजयाचा माझ्यापेक्षाही जास्त आनंद अनिल राठोड यांना झाला असता,’ अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.