
दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून, भयमुक्त शिर्डी करण्यासाठी पोलीस आता ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. गुरुवारी पहाटे शिर्डी पोलीस नगरपरिषद व साईबाबा संस्थान यांनी संयुक्त कारवाई करत साईभक्तांना त्रास देणाऱ्या 72 भिकाऱ्यांची धरपकड करीत त्यांची रवानगी बेगर हाऊस येथे करण्यात आली. शिर्डीत अशाप्रकारची कारवाई प्रथमच झाल्याने ग्रामस्थांनी व भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पकडलेले सर्व भिकारी 14 जिल्ह्यांसह 5 राज्यांतील आहेत. तसेच यात एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
शिर्डीतील घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस, नगरपरिषद व साई संस्थान प्रशासनाची बैठक घेण्यात आली होती. शिर्डी ग्रामस्थांनीदेखील ग्रामसभा घेऊन भयमुक्त शिर्डीचा नारा देऊन शिर्डीतील गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांविरोधात व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल व रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत शिर्डी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबरोबरच शिडींत सुरू असलेला गुटखा जुगार, मटका व इतर अवैध व्यवसायांवर छापा टाकण्याची मोहीम हाती घेत गुरुवारी (20) भाविकांना त्रास देणाऱ्या 60 पुरुष तसेच 12 महिला अशा एकूण 72 भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाच्या परवानगीने पुरुष भिकाऱ्यांना श्रीगोंदा येथील विसापूर बेगर होम येथे, तर महिला भिकाऱ्यांची मुंबई येथील बेगर होममध्ये रवानगी करण्यात येणार आहे. नशा व अमली पदार्थ सेवन करून साईभक्तांना त्रास देणारे पकडण्यात आलेले 72 भिकारी हे शिर्डी, अहिल्यानगर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, वाशिम, जळगाव, अकोले, बुलढाणा, नांदेड, सांगली, सोलापूर, यवतमाळ, कर्नाटक, मध्य पदेश, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या ठिकाणांहून शिर्डीत आल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, साई संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तडीपार केलेल्यांना पकडणार
दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांची बदली शिर्डी येथे करण्यात आली आहे. गलांडे यांनी शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या कागदावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई तसेच तडीपार असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.