
युनायटेड किंगडम येथून शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्त परिवाराला पूजासाहित्य असलेले ताट चार हजार रुपयांना विकून फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी जागामालक-चालक, एजंटवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
मूळ पंजाब येथील आणि व्यवसायानिमित्त युनायटेड किंगडम येथे स्थायिक असलेले साईभक्त कुटुंबीय आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना त्यांना कमिशन एजंट ऊर्फ पॉलिसी एजंटने हार फूल-प्रसाद दुकानावर घेऊन जात 500 रुपये किमतीचे पूजासाहित्याचे ताट चार हजार रुपयांना विकले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भाविकांनी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना घडलेला प्रकार सांगितला. माळी हे स्वतः भाविकांना घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात गेले आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून, यात फूल भांडार दुकान जागामालक चालक आणि कमिशन एजंट या सर्वांना आरोपी केले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
फसवणूकप्रकरणी आता जागामालकांवरही गुन्हा – वमने
शिर्डीत साईभक्तांना लुटण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याने यापुढे आता मूळ जागामालकांनादेखील आरोपी केले जाणार आहे. अगदी लहान दुकान तीन ते चार हजार रुपये रोजाने भाड्याने दिले जाते. यामुळे भाविकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी आता कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच शिडर्डीतील फूल भांडार दुकानांवर पूजासाहित्याचे दरपत्रक लावणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आहे.
गुजरातच्या साईभक्तांना बंदुकीचा धाकाने लुटले
गुजरात येथील साईभक्ताचे वाहन अडवून सात ते आठजणांनी बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवीत एक लाखाचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात रविवारी (16 फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात सात ते आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी मोहित पाटील हे सहकाऱ्यांसोबत इटिंगा गाडीतून साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. यावेळी वेळापूर शिवार (ता. कोपरगाव) येथे भाविकांची मोटार अडविण्यात आली. यावेळी काळे कपडे घातलेल्या सात ते आठजणांनी हातातील गन, गुप्ती, कोयते यांचा धाक दाखविला. भाविकांच्या गाडीच्या काचा फोडून मोहित महेश पाटील व त्यांच्या मित्रांकडील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एक लाख 800 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी मोहित पाटील (रा. सुरत, गुजरात) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठजणांविरोधात विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.