
कोपरगाव तालुक्यातील आणि शिर्डीजवळ असलेल्या काकडी विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर रात्री अज्ञात इसमांनी सशस्त्र हल्ला करून बाप-लेकाचा खून केला. शिर्डीजवळ घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने पुन्हा खळबळ उडाली आहे.
मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय – 32) व त्याचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय – 60) अशी हल्ल्यात ठार झालेल्यांची नावे आहेत, तर आई साखरबाई साहेबराव भोसले (वय – 55) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची सासू गजुबाई मारुती दिघे (वय – 70) या मात्र बचावल्या आहेत. दरम्यान, ही घटना जाणीवपूर्वक केलेला खून आहे की दरोडा याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांचे सहकारी घेत आहेत.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शिर्डी-काकडी विमानतळाजवळील दिघे वस्तीवर रोज दूध काढण्यासाठी होणारी कोणतीही हालचाल दिसली नाही, शिवाय सकाळी दूध घालण्यासाठी गावात जाण्यासाठी कोणीही घराबाहेर पडले नाही म्हणून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी जाऊन पाहणी केली असता खुनाची ही घटना उघडकीस आली. नागरिकांनी राहाता ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घटनास्थळी कृष्णा साहेबराव भोसले हे जागीच ठार झाल्याचे दिसून आले, तर त्यांचे वडील साहेबराव भोसले गंभीर जखमी असल्याचे दिसले. त्यांना तातडीने शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आई साखरबाई भोसले ही गंभीर जखमी असून, त्या कोमात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ही घटना जाणीवपूर्वक केलेला खून आहे की, दरोडा याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांचे सहकारी घेत आहेत. या घटनेने शिर्डीसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळाची पोलिसांनी नाकाबंदी केली असून, वस्तीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.