
अहिल्यानगर शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये चार भिक्षेकरूंच्या मृत्यूप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण यांनी दिली. या अहवालात जिल्हा रुग्णालयाला ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे. भिक्षेकरूंचे मृत्यू हे उपचारांतील हलगर्जीपणामुळे नव्हे, तर हृदयविकार, मेंदूतील रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज), यकृताला (लिव्हर) सूज, रक्तदाब आदी कारणांनी झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ड्युटीवरील सात ते आठ अधिकारी कर्मचाऱ्यांचे जबाब, भिक्षेकरूंवर केलेले उपचार, लॅब तपासण्या आणि शवविच्छेदन अहवाल विचारात घेऊन समितीने हा अहवाल तयार केला होता. शिर्डीतून 5 एप्रिल रोजी 49 भिक्षेकरूंना पकडून विसापूर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले होते.
नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील भिक्षेकरूंना ताब्यात घेऊन श्रीगोंद्याच्या विसापूर येथील भिक्षेकरीगृहात ठेवण्यात आले होते. त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले होते. उपचारांदरम्यान चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाला होता. यानंतर रुग्णालय प्रशासनावरही गंभीर आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण यांनी दिले होते. तसेच यासाठी तीनजणांची समिती नियुक्त केली होती. या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आता या समितीने जिल्हा रुग्णालयाला ‘क्लीन चिट’ दिली आहे.
चार भिक्षेकरूंचे मृत्यू हे हृदयविकार, मेंदूत रक्तस्राव, यकृताला सूज, रक्तदाबाने झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भिक्षेकरूंना रुग्णालयात पाणी दिले नाही, त्यांना बांधून ठेवले, असे आरोप झाल्याने प्रकरण चांगलेच तापले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ चौकशीच्या सूचना केल्या होत्या. खासदार नीलेश लंके यांनीही जिल्हा रुग्णालयात जाऊन संताप व्यक्त केला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळताना डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. शिवशंकर वलांडे व डॉ. दर्शना बारवकर, तसेच लिपिक घाडगे यांची चौकशी समिती नेमली. त्यांना 24 तासांत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.
उपचारांत हलगर्जीपणा नसल्याचा निर्वाळा
चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे की, चौघांच्या मृत्यूवेळी कर्तव्यावर असलेले डॉक्टर, सिस्टर व इतर स्टाफचे जबाब अहवालात समावेश केले आहेत. याशिवाय बाह्यरुग्ण विभागातूनही आवश्यक नोंदी घेतल्या. एकूणच, रुग्ण दाखल कधी झाले, त्यांना पूर्वी कोणते आजार होते, जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर कोणी व काय उपचार केले, त्यांच्या कोणत्या तपासण्या केल्या, संबंधित रुग्ण असलेल्या विभागातून कॉल आल्यानंतर डॉक्टर किती वेळात तेथे पोहोचले? आदी बाबींची चौकशी करून अहवालात नोंदी घेण्यात आल्या आहेत. तसेच शवविच्छेदन अहवालही चौकशी समितीला प्राप्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे जवाब आणि शवविच्छेदन अहवाल विचारात घेऊन चौघांच्या मृत्यूला जिल्हा रुग्णालय प्रशासन कारणीभूत ठरत नाही. चौघांवर वेळेवर व योग्य उपचार झाले आहेत. मात्र, हृदयविकार, लिव्हरला सूज, मेंदूमध्ये रक्तस्त्राव, रक्तदाब आदी कारणांनीच चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.
व्हिसेरा ‘ससून’कडे पाठविला
जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालानुसार चौघांच्या मृत्यूची कारणे समोर आली आहेत. मात्र, याचा व्हिसेरा बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे (ससून रुग्णालय) यांच्याकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
तीन भिक्षेकऱ्यांच्या ‘मिसिंग’ची फिर्याद दाखल
तीन भिक्षेकरी नगर जिल्हा रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी उशिरा ‘मिसिंग’ची नोंद घेण्यात आली होती. भिक्षेकरीगृहाचे केअरटेकर दामोदर रामचंद्र बिदे (वय – 58) यांनी तक्रार दिली होती. बाळासाहेब रामराव आग्रे (वय – 33), रमेश गंगाधर सूर्यवंशी (वय – 52) व रामदास सखाराम निकम (वय – 55) अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. भिक्षेकरी मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यावेळी तिघे बेपत्ता झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.