कर्जत-खालापूरमध्ये मिंध्यांच्या महेंद्र थोरवेंचा बॅण्ड वाजणार; अजित पवार गटाने केला उमेदवारीवर दावा

विधानसभा निवडणूक जवळ आली असताना कर्जत-खालापूर मतदारसंघात खोके सरकारमधील घटक पक्षांमध्ये जोरदार वाद उफाळून आला आहे. या मतदारसंघावर अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी दावा करून प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॅण्ड वाजणार अशी चर्चा कर्जमध्ये सुरू झाली आहे. थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने एका कारचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्याविरोधात जनतेमध्ये संताप उफाळून आला आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही कर्जत-खालापूर मतदारसंघाचा प्रश्न खोके सरकारच्या घटक पक्षांना अद्याप सोडवताआला नाही. मिंध्यांचे महेंद्र थोरवे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असले तरी हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी भाजप आणि अजित पवार गटाने केली आहे. अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी या मतदारसंघावर जोरदार दावा करून तिकीट आपल्यालाच मिळणार, असे जाहीर केले आहे. घारे फक्त एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी मतदारसंघात प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आणि थोरवे यांची एकच पळापळ उडाली आहे. थोरवे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्यामुळे त्यांचा पत्ता कट केला असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाल्याने थोरवे यांची डोकेदुखी वाढली आहे.

फक्त नातेवाईकांचा विकास केला

महेंद्र थोरवे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकीर्दीत मतदारसंघाऐवजी फक्त नातेवाईकांचा विकास केला आहे. खालापूर आणि परिसरातील एमआयडीसीमध्ये साडेतीनशे कंपन्या आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. सर्वच ठिकाणी थोरवेंच्या नातेवाईकांची ठेकेदारी सुरू आहे, असा आरोपही सुधाकर घारे यांनी जाहीर कार्यक्रमातून केला आहे. त्यामुळे थोरवेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.