
‘गद्दार’ गीतामुळे अंगाचा तीळपापड झालेल्या मिंधे गटाने स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. कामरावर फौजदारी कारवाई करण्यात यश न आल्याने मिंधे गटाने आता कामराच्या शोमध्ये खो घालण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे. कामराच्या शोची तिकीट विक्री थांबवण्यासाठी मिंधे गटाने ‘बुक माय शो’ला पत्र लिहिले आहे.
‘बुक माय शो’ने यापूर्वी कुणाल कामराच्या शोसाठी तिकीट विक्री उपलब्ध करून दिली आहे, मात्र यापुढे कामराच्या शोची तिकीट विक्री थांबवा, अशी मागणी करीत मिंधे गटाने ‘बुक माय शो’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. कामराने गायलेल्या ‘गद्दार’ गीतामुळे मिंधे गट प्रचंड अस्वस्थ झाला आहे. त्यातच कामराला मद्रास येथील न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे कामराला अटक करण्यासाठी मिंधे गटाने सुरू केलेले ‘उद्योग’ अपयशी ठरले आहेत. त्यातून चिडचिड निर्माण झाल्याने मिंधे गटाने आता कामराच्या शोमध्ये खो घालण्यासाठी नव्या कुरापती सुरू केल्याचे उघडकीस येत आहे. दुसरीकडे कामरा मात्र मिंधे गटाच्या अशा कुरापतींना जुमानत नसल्याचे दिसून येते.