गेल्या दहा दिवसांपासून राज्यामध्ये महायुतीचा गोधळ पाहायला मिळत आहे. मोठा विजय मिळाल्यानंतरही मानापमानाचं नाट्य रंगलेलं असून मिंध्यांना योग्य तो मान मिळावा, अशी मागणी मिंधे गटाचे नेते करत आहेत. मात्र भाजप त्यांना जराही थारा देत नसून फोन करूनही भाजपकडून कोणतंही उत्तर दिलं जात नसल्याने मिंधे गटाची घालमेल सुरू आहे. शपथविधी सोहळ्यात आम्हालाही सहभागी करून घ्या, अशा प्रकारचा सूर मिंधे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून आळवला आहे.
महायुतीकडून सरकार स्थापनेची तयारी सुरू असून भाजपचे अनेक नेते 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे पोहोचले होते. मात्र शपथविधी सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी मिंधे गटाला भाजपकडून बोलवण्यात आलं नाही.
यावरच आपली प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, ”मी देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला होता की, मला बोलायचं आहे. मात्र ते विश्रांती घेत असल्याने माझं बोलणं झालं नाही. ते आमचे सुद्धा नेते आहेत. मी त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. शपथविधी सोहळ्यासाठी पाहणी होत असताना तिन्ही पक्ष एकत्र गेले पाहिजे होते. कारण राष्ट्रवादीचे नेतेही तिथे नव्हते. महायुतीची सत्ता येणार आहे, आनंद आम्हाला सुद्धा आहे. आपल्या आनंदात आम्हाला सुद्धा सहभागी होऊ द्या, इतकीच विनंती करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार होतो.”