ज्या चाळीस जणांनी विश्वासघात केला, त्यात रत्नागिरीचा गद्दारही होता, त्याला धडा शिकवा; भास्कर जाधव यांचा घणाघात

ज्या चाळीस आमदारांनी विश्वासघात करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलं. त्यात तुमच्या इथलाही माणूस होता. शिवसेना, महाराष्ट्र आणि उध्दव ठाकरे यांना धोका देणाऱ्या त्या गद्दाराला धडा शिकवा, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी केला. आपले उमेदवार बाळ माने यांना विजयी करण्यासाठी आपले मशाल चिन्ह लक्षात ठेवा, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी केले. ते कर्ला येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

भास्कर जाधव यांची तोफ रत्नागिरीत धडाडली. रत्नागिरी मतदारसंघात पावस,कर्ला,वाटद, कारवांचीवाडी आणि खाडीपट्टा येथे झंझावाती सभा झाल्या.कर्ला येथील सभेत भास्कर जाधव म्हणाले की, या मतदारसंघातील जनतेत एक चीड आणि संताप आहे. इथल्या राजवटीला मतदार कंटाळले आहेत. गेल्या वीस वर्षात रत्नागिरीचा विकास खुंटल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. गेल्या अनेक वर्षात ठाकरे कुटुंबाने कधीच कोणतेही पदे आपल्याकडे घेतली नाहीत. दोन मुख्यमंत्री झाले. लोकसभा अध्यक्षपद मनोहर जोशींना दिले. कुणाला आमदार केलं, कुणाला खासदार केलं, कुणाला महापौर केले. 2019 मध्ये जेव्हा उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा या चाळीस आमदारांनी विश्वासघात केला. धोका देत उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवलं. त्या गद्दारांमध्ये तुमचा रत्नागिरीचा माणूस होता.त्या गद्दाराला धडा शिकवा. आता आपल्या बाळ माने यांना विजयी करा, 20 नोव्हेंबरला मशाल चिन्हासमोरील बटण दाबा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विलास चाळके,उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे,तालुकाप्रमुख प्रदीप साळवी,उमेदवार बाळ माने,कॉंग्रेसचे समन्वयक रमेश कीर,दीपक राऊत,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात पाचही जागा जिंकणार
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते.या निवडणूकीत जिल्ह्यातील पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.तसेच रिफायनरी प्रकल्पाबाबत मिंधे गटाच्या बदलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मिंधे गटाची आधीची भूमिका चुकीची होती, त्याबद्दल त्यांना प्रायश्चित मिळाले पाहिजे असा टोलाही त्यांनी हाणला. गुहागर मतदारसंघाबाबत भास्कर जाधव म्हणाले की,माझे प्रतिस्पर्धी मिंधे गटाचे उमेदवार राजेश बेंडल 25 हजार मतांच्या पुढे जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.