
श्री विठ्ठलाचा धावा करत ऊन, वारा, पावसात शेकडो मैलांचे अंतर चालत येऊन देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी वारकरी 10-12 तास दर्शनरांगेत उभे आहेत. मात्र वारकऱ्यांच्या मागे लागलेले मिंध्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही. मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. मात्र बुधवारी मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी शॉर्टकट दर्शनासाठी घातलेला गोंधळ शांत होत नाही तोच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांची घुसखोरी पुढे आली आहे. आपल्या खात्यातील अधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील सात जणांची प्राधान्याने आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाची व्यवस्था करावी, असे पत्रच सामंत यांनी मंदिर समितीला दिले आहे. या प्रकारामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा 17 जुलै रोजी आहे. आषाढी एकादशीला तर वारकरी-भाविकांची संख्या 15 लाखांवर जाते. त्या वेळी दर्शनासाठी 30-40 तासांचा कालावधी लागतो. त्यात वयोवृद्ध वारकरी, महिलांची संख्या मोठी असते. मात्र शासनकर्तेच घुसखोरी करून व्हीआयपी दर्शन घेताना दिसत आहेत. त्यामुळे वारकरी संतप्त आहेत.
व्हीआयपी दर्शन बंद तरी घुसखोरी
वारीच्या काळात मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना शेकडो फोन हे व्हीआयपी दर्शन घडवा यासाठी येत असतात. त्यामुळे अधिकारी फोन बंद ठेवतात. या सगळ्या त्रासाला कंटाळून मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरेंनी गोंधळ घालून निर्णयाला मोडता घातला. आता मंत्री उदय सामंत यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.
उदय सामंत यांचे पत्र काय आहे…
‘‘नितीन सवडतकर हे माझ्या आस्थापनेवर या विकास पदावर कार्यरत असून ते सहकुटुंब (एकूण 7 व्यक्ती) 17 जुलै रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाई देवदर्शनाकरिता येणार आहेत. प्राधान्याने त्यांची दर्शन व्यवस्था करावी,’’ असे मंत्री उदय सामंत यांची सही-शिक्का असलेले पत्र सोलापूर जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीकडे आले आहे. या पत्राची माहिती मिळताच वारकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गोरगरीब वारकऱ्यांवर अन्याय करू नका, अन्यथा…
मंत्री महोदय माणुसकीचे भान ठेवा, सत्ता आहे म्हणून तुम्ही गोरगरीब भाविकांवर अन्याय करणार असाल तर वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे यांनी दिला आहे.