
गेल्या तीन महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडच्या दौऱ्यावर येत असतानाच हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मिंध्यांचे आमदार महेंद्र दळवी यांनी तर आरपारची भाषा सुरू केली असून भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही तर मोठा उठाव होईल, असा फुसका दम भाजपला भरला आहे. या फुसक्या ‘दम मारो दम’ची सध्या रायगड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना जेवणाचे अवताण दिले असून या डिनर डिप्लोमसीमध्ये तरी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल काय, असा सवाल विचारण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली तेव्हा त्यात अदिती तटकरे यांचे नाव होते. त्यामुळे संतप्त झालेल्या मिंधे गटाच्या भरत गोगावले यांच्या बगलबच्चांनी जोरदार विरोध करीत मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली. मिंधे व अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत.
जिल्ह्यात खमंग चर्चा
अमित शहा हे आपल्या रायगड दौऱ्याच्या वेळी सुतारवाडीमधील सुनील तटकरे यांच्या घरी पाहुणचारासाठी जाणार आहेत. त्यावरून मिंध्यांचे आमदार महेंद्र दळवी संतप्त झाले असून रायगडचे पालकमंत्रीपद आम्हालाच द्या नाही तर तुम्हाला भारी पडेल, अशी दमबाजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेले भरत गोगावले यांनीही अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. त्यांनी सांगितले की, तटकरे यांच्या घरी अमित शहा यांनी जेवणाचे निमंत्रण स्वीकारले म्हणजे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असे नाही, या शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.