
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोहोबाजूने नाकाबंदी करताच चवताळलेल्या मिंध्यांनी आता थेट फडणवीसांच्या गृहखात्यावरच लांच्छन लावले आहे. महाराष्ट्र पोलीस हे जगात सर्वात अकार्यक्षम असल्याची बेताल बडबड बुलढाण्याचे गद्दार आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी स्वतःच आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला.
वाचाळ आणि बिनडोक वक्तव्यांसाठी कुख्यात असलेले मिंधे गटाचे थेट आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभारी असलेल्या गृहखात्यावरच गंभीर आरोप केला. ‘माझ्या पार्टनरशिप मुलाला धमकीचे पत्र आले. माझी गाडी उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही चौकशी केली नाही. शासनाने कोणताही नवीन कायदा केला की पोलिसांचा हप्ता वाढतो. दारूबंदीच्या नावाखाली पोलीस हप्ते खातात. पकडलेला मुद्देमाल 50 लाखांचा असेल तर पोलीस तो फक्त 50 हजार रुपयांचाच दाखवतात. मुळात महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम या जगात दुसरे कोणीच नाही…’ आमदार संजय गायकवाड यांचा सुटलेला तोल पाहून पत्रकारही अवाक् झाले.
एकनाथ शिंदेंनी समज द्यावी
आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वटवटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बडबडीला लगाम घातला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले,
आभार नाही, माफी मागा!
गद्दारांचे नेते एकनाथ शिंदे हे रविवारी बुलढाण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आभार मानण्यासाठी येत असलेल्या शिंदेंना जिल्ह्याची परिस्थिती माहिती आहे का? शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुणांना रोजगार नाही, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत आभार कसले मानता? माफी मागा! असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी लगावला.