
रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंधे अजित पवार गटात रणकंदन सुरू आहे. हा वाद एकमेकांची अब्रू चव्हाट्यावर आणण्यापर्यंत पोहोचला आहे. याचीच प्रचिती बुधवारी अलिबागमध्ये आली. मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचा शेलक्या भाषेत उल्लेख करत ‘औरंगजेब सुतारवाडीत बसलाय’ अशी टीका केली.
जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार गटाच्या आमदार आदिती तटकरे यांची नियुक्ती केली. आदिती तटकरे यांच्या नियुक्तीवरून मिंधे गटाने थयथयाट करत विरोध केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. तेव्हापासून रायगडचे पालकमंत्री पद रिक्त असून यावरून मिंधे व अजित पवार गटात कलगीतुरा रंगला आहे.
दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदावरून पंचांचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. ही टोका मिंधेना चांगलीच झोंबली.
आमदार महेंद्र थोरवे अलिबागमध्ये एका कार्यक्रमात बोलताना क्रिकेटचं उदाहरण आम्हाला देऊ नका. सगळंच तुम्हाला मिळणार नाही. यापुढे खासदारच काय ग्रामपंचायत सदस्यसुद्धा तुम्ही होणार नाही असा इशारा दिला. यापुढे जाऊन त्यांनी ‘आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय’ अशी टीकाही केली.
थोरवेंचे काळे धंदे जगजाहीर करू!
आमदार थोरवे यांनी सुनील तटकरे यांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे. म्हसळा तालुका कार्यकारिणीने थोरवे यांचा जाहीर निषेध केला. गद्दार थोरवे यांनी गुवाहाटीला जाऊन टेबलावर चढून धिंगाणा घातला. त्यांचा बदलौकिक महाराष्ट्र चांगला ओळखतो. त्यांनी तारतम्य बाळगून बोलावे अन्यथा त्यांचे काळे धंदे जगजाहीर करू, असा इशारा तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी दिला.