मिंधे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा सोनावळे याच्या गुन्हेगारी रेकॉर्डचा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पर्दाफाश केला. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्जत, खालापूर मतदारसंघात ठोकशाही करण्यासाठी मिंधे गटाने गुंड पोसल्याची टीका करतानाच सोनावळे याच्यावर नेरळ, कर्जत तसेच खोपोली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची लिस्टच दाखवली. मिंधेंची ही गुंडशाही आगामी विधानसभा निवडणुकीत येथील जनता उलथवून लावेल, असा विश्वासही नितीन सावंत यांनी व्यक्त केला.
नेरळ येथे भररस्त्यात 7 सप्टेंबर रोजी शिवा याने एका कारचालकाला लोखंडी रॉडने मारहाण केली होती. मात्र चार दिवस उलटले तरी याबाबत पोलिसांनी या घटनेची साधी दखलही घेतली नाही. या गुंडशाहीची चिरफाड करण्यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाऊंटवरून 11 सप्टेंबर रोजी याबाबतचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. यानंतर सोशल मीडियावर मिंधेंच्या ठोकशाहीवर टीकेची झोड उठटाच पोलिसांनी शिवाला ताब्यात घेत कारवाई केली. त्यामुळे तिळपापड झालेल्या थोरवे यांनी शिवा हा आपला बॉडीगार्ड नसून कार्यकर्ता असल्याची सारवासारव केली. तसेच हे माझ्याविरोधात शिवसेनेने रचलेले षड्यंत्र असल्याचा अजब तर्क लावला. मिंधेंच्या या चोराच्या उलट्या बोंबांची चिरफाड करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला.
सर्वसामान्यांबरोबरच अधिकारीदेखील दहशतीखाली
माथेरान येथील माजी नगरसेवक तथा संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्या प्रकरणात शिवा सोनावळे हा तीन नंबरचा आरोपी होता. त्यावेळी याच थोरवे यांनी तो आपला कार्यकर्ता नव्हता असे जाहीर केले होते. मात्र नेरळच्या प्रकरणानंतर थोरवे यांनी शिवा हा आपला बॉडीगार्ड नसून कार्यकर्ता असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रसाद सावंत यांच्यावरील हल्ल्याची एकप्रकारे थोरवे यांनी कबुलीच दिल्याचे सांगत नितीन सावंत यांनी मिंधेंचा बुरखा फाडला आहे यावेळी तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, संघटक बाबू घारे उपस्थित होते.