
मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानमध्ये केलेली ढवळाढवळ त्यांच्या चांगलीच अंगलट येणार आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता थोरवे यांनी दोन दिवसांपूर्वी माथेरानच्या प्रवेशद्वारावर ई-रिक्षांसाठी निश्चित केलेली जागा बदलून या ठिकाणी घोडेचालकांना जागा दिली आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर घेतलेल्या या निर्णयाने माथेरान बचाव समितीचे पदाधिकारी संतप्त झाले असून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तर थोरवेंच्या दंडेलशाही कारभाराविरोधात राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भविष्यत थोरवे यांची डोकेदुखी वाढणार आहे.
माथेरान दस्तुरी नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांची घोडेस्वारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी माथेरान बचाव समितीकडून गेल्या महिन्यात माथेरान बंद ठेवण्यात आले होते. हा बंद मागे घेण्यासाठी माथेरान बचाव समिती आणि माथेरान घोडे व्यवसाय तसेच विविध संघटनांमध्ये चर्चा होऊन मार्ग काढण्यात आला होता. यामध्ये माथेरान शहरात जाण्यासाठी प्रवेश मार्गावर एका बाजूस ई-रिक्षा आणि त्यांच्या मागे घोडे व्यवसाय चालक उभे राहतील असे ठरले होते. दरम्यान घोडे व्यावसायिकांनी आमदार थोरवे यांची भेट घेताच त्यांनी हा निर्णय परस्पर फिरवत ई-रिक्षांना हटवून त्याठिकाणी घोडेचालकांना जागा दिली आहे. तसेच पार्किंगमध्येही जाण्यास घोडेचालकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महसूल अधीक्षक कार्यालयावर धडक
थोरवेंच्या निर्णयाविरोधात माथेरान पर्यटन बचाव समितीच्या पधाधिकाऱ्यांनी महसूल अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. घोडेचालकांसाठी घेतलेला निर्णय एकतर्फी आहे. ई-रिक्षाचा थांबा आम्ही एक इंचदेखील हटवू देणार नाही. असे केल्यास याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराच यावेळी देण्यात आला. माथेरानच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा बंदची हाक देण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलावली बैठक
विकासाचे काम असो की अन्य कोणताही निर्णय महेंद्र थोरवे हे नेहमीच आम्हाला डावलून काम करत असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यामुळे थोरवे यांना धडा शिकवण्यासाठी भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांच्यासह किरण चौधरी, सुभाष भोसले, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, आकाश चौधरी, राजेश चौधरी, राकेश चौधरी, संदीप कदम यांनी आपले राजीनामे वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून दिले आहेत. याची गंभीर दखल आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, रवींद चव्हाण यांनी घेतल्याची चर्चा असून सोमवारी बैठक बोलावली आहे.