अलिबागमधील दीड कोटीची लूट… लोकप्रतिनिधीच दरोडेखोर; दरोडा घालायला मिंधे आमदार महेंद्र दळवी यांनी बॉडीगार्ड पाठवले

राज्यात आम्ही सुशासन आणले असा टेंभा मिरवणाऱ्या मिंध्यांचा आता पुरता पर्दाफाश झाला आहे. अलिबागमधील दीड कोटी रुपयांच्या दरोडय़ात मिंधे आमदार महेंद्र दळवींचा हात असल्याचे भयंकर वास्तव उघडकीस आले आहे. या दरोडय़ातील दीड कोटीची रोकड लुटण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी आपले दोन बॉडीगार्ड पाठवले होते, असा धक्कादायक कबुलीजबाब मुख्य आरोपी आणि आमदारांचा हरकाम्या समाधान पिंजारी याने पोलिसांना दिला आहे. त्यामुळे दळवी यांचा पाय पुरता खोलात गेला आहे. लोकप्रतिनिधीच दरोडेखोरांचे साथीदार निघाल्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून दळवींवर काय कारवाई होतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अलिबाग तीनवीरा येथे दीड कोटीचा दरोडा घालणारा आरोपी समाधान पिंजारी याने नागपूर येथील सोन्याचे व्यापारी नामदेव हुलगे यांच्याशी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला. शंकर कुळे याच्याकडे 7 किलो सोने असून ते तो 5 कोटी रुपयांमध्ये द्यायला तयार आहे , असे आमिष पिंजारी याने हुलगे यांना दाखवले. सोने स्वस्तात मिळत असल्याने ते खरेदी करण्याचा निर्णय हुलगे यांनी घेतला. 1 कोटी 50 लाख रुपये घेऊन हुलगे, आमदार दळवी यांचा नोकर दीप गायकवाड व इतर मंडळी एका कारमधून अलिबागकडे निघाले. तिनविरा धरणाजवळ आल्यावर दीप गायकवाडने कार थांबवली. पोलीस आले आहेत, असे सांगून त्याने हुलगे आणि त्यांच्या सहका-याला गाडीतून उतरवले. ते गाडीतून उतरताच आमदार दळवी यांचा नोकर दीप गायकवाडने कार सुरू करून तेथून पनवेलच्या दिशेने पळ काढला होता. याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी दळवी यांच्याकडे काम करणारे समाधान पिंजारी, दीप गायकवाड, बॉडीगार्ड समीर म्हात्रे, विकी साबळे यांच्यासह विशाल पिंजारी, अक्षय खोत यांना ताब्यात घेतले आहे. दरोडय़ाचा मुख्य सूत्रधार समाधान पिंजारी याची कसून चौकशी केल्यानंतर या दरोडय़ात आमदार महेंद्र दळवी यांचाही हात असल्याचे उघड झाले आहे.

आठ महिन्यांपूर्वी झाली होती आरोपींची फसवणूक

दरोडय़ाचा सूत्रधार समाधान पिंजारीचे नातेवाईक नितीन पिंजारी, नामदेव हुलगे व नवनाथ पिंजारी हे सोने खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतात. नागपूर येथे त्यांचे दुकान आहे. आठ महिन्यांपूर्वी या तिघांनी समाधान पिंजारीला त्यांच्याकडे असलेले 3 किलो सोने स्वस्त दरात 2 कोटी रुपयांना विकायचे आहे असे सांगितले. नातेवाईक असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून समाधानने ही बाब आमदार दळवींच्या कानावर घातली. त्यानुसार दळवींनी त्याला दोन कोटी रुपये दिले. ठरल्याप्रमाणे दहा दिवसांनी समाधानचा चुलत भाऊ नितीन पिंजारी, नामदेव हुलगे व नवनाथ पिंजारी हे इन्होवा कारने अलिबागला आले. समाधानने 2 कोटी रुपये त्यांना दिले, मात्र त्यांनी सोने मागून येत असल्याचे कारण सांगत समाधानला नाशिकपर्यंत नेले. नाशिकला एका ठिकाणी त्याला थांबवून अन्य तिघे सोने घेऊन येतो असे सांगून निघून गेले. 5 तास उलटल्यानंतर ते आले नाहीत म्हणून समाधानने त्यांच्याशी संपर्क साधला असता तू दिलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली, तू ताबडतोब अलिबागला निघून जा, असे त्यांनी सांगितले. हा प्रकार समाधानने दळवींच्या कानावर घातला आणि दळवींच्या सांगण्यानुसार तो अलिबागला परतला.

लुटीची रक्कम आमदारांच्या घरी

नितीन पिंजारी, नामदेव मुलगी व नवनाथ ब्रिजा कारने नागपूरहून अलिबागच्या तिनविरा धरणाजवळ आले. आमदार दळवी यांच्या सांगण्यानुसार समाधान पिंजारी हा दोन सुरक्षा रक्षकांसमवेत इन्होवा कारने तिनविराजवळ गेला. समाधान च्या सोबत पोलीस सुरक्षारक्षक पाहून त्या तिघांनी गाडी तिथेच सोडून पळ काढला. वाहनाची झडती घेतल्यानंतर समाधानला गाडीत दीड कोटी रुपये सापडले. रोख रक्कम घेऊन समाधान आमदारांच्या निवासस्थानी राजमाळा येथे गेला असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

कारवाईकडे जिह्याचे लक्ष

तीनविरा धरणाजवळ पडलेल्या दरोडय़ाचा कबुली जबाब मुख्य आरोपी समाधान पिंजारी याने पोलिसांना दिला आहे. विशेष म्हणजे त्याचा हा कबुली जबाब पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी नोंदवला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्यापर्यंत दरोड्याचे कनेक्शन गेले आहे. त्यामुळे दरोडेखोर आमदारांवर काय कारवाई होते की मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱया मारेकऱयांच्या आकाला जसे पाठीशी घातले तसे त्यांना महायुती सरकार पाठीशी घालते का, याकडे सर्व रायगड जिह्याचे लक्ष लागले आहे.

असा आखला दरोड्याचा कट

2024 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनासाठी समाधान आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत नागपूरला गेला होता. तेथे त्याने नितीन पिंजारी, नामदेव हुलगे व नवनाथ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नवीन ज्वेलर्सचे दुकान, स्कॉर्पिओ गाडी तसेच बंगला बांधल्याचे समाधानला दिसले. आपली फसवणूक झाल्याचे समाधानच्या लक्षात आले. त्यानंतर पैसे वसूल करण्याठी समाधानने दरोडय़ाचा नवा गेम प्लान आखला. त्याने एका इसमाकडे 5 किलो सोने आहे व तो स्वस्त दरात देत असल्याचे या तिघांना सांगितले. त्यानुसार तिघांनी 4 फेब्रुवारीला दोन कोटी रुपये घेऊन येतो, असे समाधानला सांगितले. त्यानंतर समाधानने हा प्रकार दळवींच्या कानावर घातला आणि आमदार दळवी यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले बॉडीगार्ड पोलीस समाधानसोबत रोकड लुटण्यासाठी पाठवले.