परवानगी नसताना प्रचार कार्यालय थाटून अब्दुल सत्तार यांचा जमीन बळकावण्याचा प्रयत्न!

सिल्लोड येथील सर्वे नंबर 377 मध्ये पठाण परिवाराची वडिलोपार्जित 2 एकर 34 गुंठे जमीन शिल्लक आहे. या जमिनीवर अब्दुल सत्तार हे कायदेशीर परवानगी नसताना निवडणूक प्रचार कार्यालय थाटून सत्तार पठाण कुटुंबीयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथे उभारलेला मंडप बेकायदेशीर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पठाण परिवाराने केली आहे.

या प्रकरणात त्यांचा कायदेशीर प्रशासकीय व न्यायालयीन लढा सध्या सुरू असून, विविध ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. त्यांच्या जमिनीवर मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘जय दुर्गा नवरात्र उत्सव’ साजरा करण्यासाठी तात्पुरती परवानगी काढून तिथे नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी भव्य मोठे मंडप शेड उभारले होते. त्यामुळे पठाण परिवाराने त्याबाबत 2 ऑक्टोबर रोजी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी कारवाई न केल्यामुळे पठाण परिवार 7 ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते.

हे उपोषण तब्बल 10 दिवस सुरू होते, शेवटी पोलिसांनी पठाण परिवारास आश्वासन दिले होते की, नवरात्र उत्सव संपल्यानंतर तेथील मंडप / शेड काढण्यात येईल, कारण दिलेली परवानगी ही तात्पुरती स्वरूपाची आहे. त्यामुळे पठाण परिवाराने उपोषण स्थगित होते.

परंतु, नवरात्र उत्सव संपूनदेखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंडप व शेड काढले नाही. त्यामुळे व्यथित होऊन पठाण परिवाराने 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन यांना लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. तसेच कारवाई न केल्यास 4 नोव्हेंबरपासून त्यांच्या जमिनीवर सहपरिवार साखळी उपोषण सुरू करण्याबाबतसुद्धा त्यांनी कळविले होते. या प्रकरणाची दखल घेऊन तालुका दंडाधिकारी सिल्लोड यांनी पोलीस निरीक्षक यांना 26 ऑक्टोबर रोजी कायदेशीर कारवाई करण्याबाबतपत्र दिले होते. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन कसलीच कारवाई करत नसल्यामुळे पठाण परिवाराने 4 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या जागेवर जाऊन साखळी उपोषण सुरू केले. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद विवाद झाला. या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. पठाण परिवार व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.

पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन साखळी उपोषण स्थगित करण्याबाबत निर्देश दिले. पठाण परिवार सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात दोन्ही गटांचे लोक जमा झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पठाण परिवाराने मंडप / शेड बेकायदेशीर असल्यामुळे तसेच त्याचा वापर निवडणूक प्रचार कार्यालय म्हणून करत असल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.