
जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा मिंधे गटाचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाही असेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आहे. धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या चुकीच्या कामांना मंजुरी दिली होती. त्याची माहिती मिळताच फडणवीस यांनी तातडीने त्या कामांना स्थगिती देऊन मिंधे गटाला आणखी एक धक्का दिला.
धाराशीव जिह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या 408 कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री सरनाईक यांनी मंजुरी दिली होती. चुकीच्या पद्धतीने ती मंजुरी दिली गेल्याचे तसेच कामांचे वाटप अयोग्य झाल्याच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. फडणवीस यांनी नुकताच धाराशीव दौरा करून तुळजा भवानीचे दर्शन घेतले होते. त्या वेळी यासंदर्भात त्यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. फडणवीस यांनी त्या 408 कोटींच्या कामांपैकी किती कामांच्या वर्प ऑर्डर्स काढल्या गेल्या याची माहिती तातडीने मागवली. 268 कोटी रुपयांच्या कामांच्या वर्प ऑर्डर्स काढल्या गेल्या नसल्याचे त्यांना समजताच त्यांनी त्या कामांना तातडीने स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दिले. मिंधे गटासाठी हा आणखी एक धक्का असल्याचे मानले जात आहे. मिंधे सरकारमध्ये मंत्री व धाराशीवचे पालकमंत्री असताना तानाजी सावंत यांनीही जिल्हा नियोजन समितीच्या कामांचे वाटप करताना फक्त आपल्याच गटाच्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य दिले होते. त्यामुळे भाजप पदाधिकाऱयांनी नाराजी व्यक्त केली होती. सावंत यांचाच कित्ता आता सरनाईक हे गिरवत असल्याचे दिसून येते.