![vinayak raut st bus](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/vinayak-raut-st-bus-696x447.jpg)
बारावीची परीक्षा असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील आभार मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यासह कराड आणि सातारा येथून शेकडो एसटी बस आरक्षित केल्या गेल्या आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून केवळ आपला टेंभा मिरवण्यासाठी मिधेगटाने हा अट्टाहास केला आहे .या सर्व प्रकाराचा मी जाहिर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली.
शनिवारी रत्नागिरीतील चंपक मैदानावर दुपारी अडीच वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मेळावा आयोजित केला आहे. या आभार मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी शेकडो बस आरक्षित केल्या आहेत.
आज बारावीचा पेपर असताना एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने परीक्षा केंद्र गाठताना विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. जी कोणती बस येईल त्यात चेंगराचेंगरी करत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे. या सर्व प्रकाराचा माजी खासदार विनायक राऊत यांनी निषेध केला आहे.