सत्तेची मस्ती! वाडा तालुक्यातील उचाटमध्ये मिंधेंचा ‘मस्साजोग’, उपसरपंचाला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न

कोयना प्रकल्पग्रस्तांचे गाव असलेल्या वाडा तालुक्यातील उचाटमध्ये सध्या अदानी कंपनीच्या वतीने विजेचे भेलेमोठे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या टॉवरला विरोध केला म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपसरपंच आशिष मोरे यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री उशिरा करण्यात आला. सत्तेची मस्ती असलेल्या मिंधे गटाचे पदाधिकारी सचिन आणि बंटी पाटील यांनी ही गुंडगिरी केली असून तुम्हाला उचाट गावचा ‘मस्साजोग’ करायचा आहे काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

वाडा तालुक्यातील उचाट या गावामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचे काही वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आले. सुमारे दोनशे कुटुंबे तेथे राहत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता विजेची हायटेन्शन वायर टाकण्यासाठी अदानी कंपनीच्या वतीने भेलेमोठे लोखंडी टॉवर्स टाकण्याचे काम सुरू आहे. बुधवारी रात्री अचानक कंपनीचे कामगार आले अणि गावातील रूपेश लांब यांच्या जमिनीत टॉवरसाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. त्यास विरोध करण्यात आला. ही बाब उपसरपंच आशिष मोरे यांना सांगितली. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

रूपेश लांब या ग्रामस्थाने वाडा पोलीस ठाणे गाठले आणि त्यांच्या जागेत बेकायदेशीरपणे अदानी कंपनीमार्फत सुरू असलेल्या टॉवरच्या कामाची माहिती दिली. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यान अदानी कंपनीचे परप्रांतीय ठेकेदार व्यंकटेशन यांनी रूपेश लांब यांना उचाट गावात येण्यास सांगितले. त्यानंतर कुडूस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्यासोबत चर्चादेखील करण्यात आली. साबळे निघून जाताच मागाठणे येथील मिंधे गटाचे पदाधिकारी सचिन पाटील व बंटी पाटील यांनी अदानीच्या टॉवरला विरोध करणारे उपसरपंच आशिष मोरे यांच्या थेट अंगावर गाडी घालून त्यांना ठार माण्याचा प्रयत्न केला.

गृहमंत्री आवर घालणार काय?

मिंधे गटाचे पदाधिकारी केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर अदानीच्या कामाला विरोध केल्यास घरात घुसून मारू, अशी धमकीदेखील त्यांनी दिली. त्यामुळे उचाट गावात एकच खळबळ उडाली आहे. सत्तेची मस्ती चढलेल्यांना राज्याचे गृहमंत्री आवर घालणार काय, असा थेट सवाल उपसरपंच आशिष मोरे यांचे बंधू व शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख तानाजी मोरे यांनी केला आहे.