मिंधे सरकारच्या पोषण आहारात कधी पक्षी, साप, अळ्या तर आता बेडूक; शिवसेनेकडून संताप व्यक्त

राज्य सरकारकडून अंगणवाडीमध्ये आणि शाळेत दिला जाणारा पोषण आहार वादात अडकला आहे. या खाद्यपगार्थ्यांच्या दर्जाबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तसेच येथील पदार्थ खाण्यायोग्य नसल्याच्या अनेक तक्रारीही आल्या आहेत. तसेच या आहारमुळे अनेक विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटण्याच्या किंवा विषबाधा होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या सर्व प्रकाराबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मिंधे सरकार गरीब जनतेला काय काय खायला घालणार आहे, असा संतप्त सवाल केला आहे.

अकोला, सांगली, नंदुरबारमध्ये पोषण आहारात अळ्या आढळल्या होत्या. त्यानंतर आता पंढरपूरमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात मृत बेडूक आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसेनगर येथील अंगणवाडीमध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेने याची दखल घेत एक्सवर पोस्ट शेअर करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गरीब गर्भवती महिला, बालक आणि शालेय विध्यार्थ्यांना शासनाद्वारे पोषण आहार दिला जातो, परंतु या आहारात कधी पक्षी, साप, अळ्या तर कधी बेडूक असे मृत प्राणी आढळले असून या गरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सगळ्याकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे. दररोजच ह्या जीवघेण्या आहाराच्या घटना घडत असताना सरकार काय करत आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मिंधे सरकार गरीब जनतेला काय काय खायला घालणार आहे, असा संतप्त सवालही करण्यात आला आहे.

मुलांना शाळेची गोडी लागावी आणि शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी शासनाकडून पोषण आहाराची योजना राबवण्यात येते. मात्र, शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार वादात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली येथील गर्भवती महिला व बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू आढळले होते. त्यानंतर नंदुरबारतील शहादा तालुक्यामधील मुबारकपूर गावातील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आढळल्याची घटना उघडकीस आली. या घटनेला आठवडा उलटला नाही तोच, पंढरपुरात पोषण आहारात मृत बेडूक सापडले. या धक्कादायक घटनेमुळे बालकांच्या जीवांशी शासनाचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच सर्व स्तरातून याबाबत संताप व्यक्त केला आहे.