मिंधे सरकारमध्ये महाराष्ट्रासाठी निधी मिळवण्याची धमक नाही; आदित्य ठाकरे यांच्याकडून समाचार

मिंधे राजवटीला फक्त दिल्लीसमोर लाचारी पत्करायला, महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात पाठवायला, प्रचंड भ्रष्टाचार करून राज्याची तिजोरी रिकामी करायला आणि फोडाफोडीचे राजकारण करायला जमते, मात्र महाराष्ट्रासाठी केंद्राकडून निधी मिळवण्याची आणि राज्याचे भले करण्याची धमकच नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मिंधे सरकारचा समाचार घेतला.

आजच्या भाजपप्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. महाराष्ट्राला अशी वागणूक का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केला आहे. महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या संविधानविरोधी सत्तेला आळा घातला म्हणून? की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे म्हणून? की महाराष्ट्रावर यांचा जुना आकस आहे म्हणून? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे.

ना विशेष पॅकेज, ना निधी, ना हक्काचा वाटा!

बिहार आणि आंध्रला त्यांचा वाटा नक्की द्या, पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही भाजपचा महाराष्ट्रावर एवढा राग कशासाठी? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातल्या ट्रिपल इंजिन सरकारला आपल्या राज्यासाठी या बजेटमधून काय मिळवता आलंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.