शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला ! मविआ उमेदवारांसाठी जुन्नर, घोडेगाव, मांडवगणमध्ये सभा

शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे मोदी शहा यांच्यापुढे काहीच चालत नाही. त्यांच्यासमोर बसून हे तिघे बोलूही शकत नाहीत. त्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला. त्यामुळे जे उद्योग गुजरातला पाठवायचे होते ते पाठविले. त्याबरोबर राज्यातील लाखो युवकांचा रोजगार गुजरातला पळविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

जिल्ह्यात आज महाविकास आघाडीतील उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ जुन्नरमध्ये, आंबेगावचे देवदत्त निकम यांच्यासाठी घोडेगाव, शिरूरचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ मांडवगण फराटा येथे जयंत पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या. या सभांना मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.

‘राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झालेली शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा केली जाईल,’ अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. सत्यशील शेरकर यांच्यासाठीच्या जुन्नरमधील सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, जगन्नाथ शेवाळे, शरद लेंडे, शरद चौधरी, गुलाब पारखे, सुनील मेहेर, बाबा परदेशी, संभाजी तांबे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ झालेल्या घोडेगावमधील सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राजाराम बाणखेले, नंदकुमार बोऱ्हाडे, अमोल काळे, गोविंद काळे, राजू इनामदार, सदानंद शेवाळे, पूजा वळसे- पाटील, उद्योजक किसन उंडे, किशोर दांगट उपस्थित होते. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ मांडवगण फराटा येथील सभेला राजेंद्र नागवडे, विकास लवांडे, भारती शेवाळे, राजेंद्र पायगुडे, बाळासाहेब नरके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, संजय सातव, युवराज दळवी आदी उपस्थित होते.

बोगद्याचे फक्त कारण

■ ‘आंबेगावच्या जनतेने शरद पवार यांना कधीही सोडलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत जनता शरद पवार यांच्यामागे उभी आहे. आंबेगावचे प्रतिनिधी कधीच पक्षबदल करणार नाहीत, असे लोक म्हणत होते; पण त्यांनी पक्ष बदलला. डिंभे बोगद्याचे कारण शोधून ते सांगतात, हा मोठा विषय नाही. पण येथील एक थेंबही पाणी कुठे जाणार नाही,’ असे जयंत पाटील यांनी सांगितले.