माहीम विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये मतदानासाठी सकाळपासून उत्साह होता. शिवाजी पार्कमध्ये मार्ंनग वॉक झाल्यावर मतदारांनी बालमोहन शाळा, वनिता समाज, सूर्यवंशी हॉल अशा केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मुंबई शहरातील दहा मतदारसंघांपैकी माहीम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात 55.23 टक्के मतदान झाले होते. या भागात अत्यंत शांतपणे मतदान सुरू होते. माहीम कापडबाजार परिसरातील मुस्लिम मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. कापड बाजारमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये लावलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो घेण्यासाठी मुस्लिम महिला मतदारांची चढाओढ लागली होती. सोबत आणलेल्या लहान मुलांना घेऊन या महिला सेल्फी काढत होत्या. या मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर मुंबई पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्रावर आले तेव्हा बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना ओळखलेच नाही. आपण कोण अशी विचारणा पोलिसांनी केली. दरम्यान, त्यापूर्वी सकाळी सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिरात असताना माध्यम प्रतिनिधी त्यांची मुलाखत घेत होते. तेव्हा त्यांच्या जॅकेटवरील धनुष्यबाणाचे चिन्ह उलटे लावले होते. त्यामुळे मतदानाच्या आधीच चिन्ह पडले अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.