’मानवी मेंदूच्या कार्याची जेवढी गुंतागुंत आहे, त्याच्या खालोखाल अमाप गुंतागुंतीची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे शिक्षण विचार आणि शिक्षण व्यवहार. एक सामाजिक वास्तव म्हणजे, शिक्षण विचार आणि शिक्षण व्यवहार यांमध्ये नेहमीच फार मोठे अंतर असते.’ सचिन जोशी लिखित ‘भारतीय शिक्षणसंस्कृतीचे शिल्पकार’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांचे हे मत शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने सर्वकाही सांगून जातात, या पुस्तकात एकूण 28 लेख असून ते हिंदुस्थानी संत, विचारवंत, समाजसुधारक आणि शिक्षक या चार विभागांमध्ये विभागलेले आहेत.
एकविसाव्या शतकातील शैक्षणिक प्रश्नांवर उपाय शोधले नाहीत तर आदर्श नागरिक कसे घडतील हा जोशी यांना पडलेला प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वरील सर्व मुद्द्यांचा विचार केला आहे का यावरही लेखकाने सविस्तर भाष्य केले आहे. अनेक शिक्षणविषयक प्रश्नांची उकल लेखकाने हिंदुस्थानी संत, विचारवंत, समाजसुधारक व शिक्षणतज्ञ यांच्या विचारांतून सहजसुंदर शैलीत केली आहे.
थोर विभूतींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन हिंदुस्थानच्या शिक्षणाचा वैचारिक इतिहास काय आहे? मूल्यसंस्कृती व शिक्षण यांचा नेमका संबंध काय? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. यासोबतच आजची शिक्षणपद्धती, शिक्षणाचे बाजारीकरण, हरवत चाललेले जीवनशिक्षण, शिक्षणाचे एकूण स्वरूप, गुणात्मक दर्जा यावरही प्रकाश टाकला आहे.
थोर व्यक्तींच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंगांमुळे पुस्तक अधिक रंजक झाले आहे. आशयघन मजकूर आकर्षक मांडणी आणि देखणे मुखपृष्ठ ही पुस्तकाची काही वैशिष्ट्ये. तेव्हा स्पर्धेमागे न धावता मुलांमधील सर्जनशीलता, जिज्ञासा व क्षमता यांना प्रोत्साहन द्यायला हवे ही शिक्षणातून मिळालेली कौशल्येच खऱया अर्थाने जीवन घडवायला मदत करतात; त्यासाठी शिक्षण कसे असावे याचा वस्तुपाठ या पुस्तकातून मिळतो. अनेक थोर विभूतींच्या शिक्षण विषयक अफाट कार्याला एका पुस्तकात बसवण्याचे अत्यंत कठीण आव्हान पेलण्यात जोशी यांना नक्कीच यश मिळाले आहे.
भारतीय शिक्षणसंस्कृतीचे शिल्पकार
लेखक : सचिन उषा विलास जोशी पृष्ठसंख्या : 256
किंमत : 350 रुपये
प्रकाशक : साकेत प्रकाशन