![sheikh mujbir rehman house](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/sheikh-mujbir-rehman-house-696x447.jpg)
हिंदुस्थानच्या शेजारील देश बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. अवामी लीगच्या प्रस्तावित देशव्यापी आंदोलनापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे. बुधवारी रात्री देशाचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान शेख हसिना यांचे वडील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या घराला आग लावून तोडफोड करण्यात आली. आज पुन्हा निदर्शकांनी तोडफोड केली. याशिवाय शेख हसिना यांच्या अवामी लीगच्या नेत्यांच्याही घरांना लक्ष्य केले गेले. तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.
राजधानी ढाका येथील धनमोंडी भागातील मुजीबुर रहमान यांच्या घरासमोर हजारो लोक जमले होते. बुधवारी रात्री उशिरा आंदोलकांनी धनमोंडी-5 रोडवरील शेख हसिना यांचेही घर जाळले. आज सकाळीही अवजड मशीनच्या मदतीने घराची तोडफोड सुरूच होती. 5 ऑगस्ट 2024 पासून बांगलादेशात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दरम्यान, खुलनामध्ये शेख हसिना यांचे चुलत भाऊ शेख सोहेल, शेख जेवेल यांची घरे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. काही आंदोलकांनी घरे आणि संग्रहालयांचा ताबा मिळवून एकच दहशत माजवली.
एका विद्यार्थी संघटनेने शेख हसिना यांच्या निषेधार्थ ‘बुलडोझर मार्च’ काढण्याची घोषणा केली होती. याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार करण्यात आला. सुरुवातीला शेख हसिना यांचे घर पाडले जाईल असे संघटनेने सांगितले, परंतु निदर्शकांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर हल्ला चढवला. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. यावेळी जमावाने शेख हसिना यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
हसिना समर्थकांच्या निषेधापूर्वी हिंसा
माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीग पक्षाने त्यांच्या समर्थकांना 6 फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरून देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. शेख हसिना यांच्यावर दाखल केलेल्या कथित खटल्यांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हसिना त्यांच्या कार्यकर्त्यांना ऑनलाइन संबोधित करणार होत्या, पण त्यांच्या समर्थकांच्या निदर्शनापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार पेटला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेख हसिना यांनी हिंदुस्थानात आश्रय घेतला आहे.