शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेतील पेंद्रावर अजित पवार व शरद पवार गटात वाद झाला. या ठिकाणी अजित पवार यांच्या नावाच्या स्लिपा वाटल्या जात असून कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला. दरम्यान, अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे आरोप फेटाळून लावले.
महात्मा गांधी बालक मंदिर शाळेत या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून काही काळ मतदान प्रक्रिया थांबली. शर्मिला पवार व अजित पवार यांनीही या केंद्राला भेट दिली.
आमच्या बुथवरील कार्यकर्त्यांना तुझ्याकडे उद्या बघतो, तुला उद्या खल्लास करतो, अशी धमकी विरोधी गटाकडून दिली जात असल्याचा आरोप युगेंद्र यांच्या आई शर्मिला यांनी केला. केला. घरचे लग्न असल्यासारखे विरोधी गटाचे काही पदाधिकारी येथे मतदारांना बोलावून घेत आहेत. उमेदवाराचे नाव, चिन्ह असलेल्या चिठ्ठया त्यांना देत आहेत. खूण करून कोणते बटण दाबायचे ते सांगत आहेत. यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या केंद्राला भेट दिली. अजित पवार यांनी शर्मिला यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, त्यांनीच माझ्या पोलिंग एजंटला मतदान पेंद्राबाहेर काढले. हा अधिकार त्यांचा नसून तो निवडणूक अधिकाऱयाचा आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, ते निवडणूक अधिकारी तपासतील. शिवाय त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर चौकशीत खरे-खोटे होईल असे ते म्हणाले.