शेअर बाजाराला अखेर ‘ब्रेक’,तीन दिवसांनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून गुंतवणूकदार मालामाल होत होते. परंतु, शुक्रवारी शेअर बाजाराच्या चढत्या आलेखाला अखेर ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 423 अंकांनी घसरून 76,619 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 108 अंकांनी घसरून 23,203 अंकांवर बंद झाला. विदेशी फंडमधील पैसा गुंतवणूकदार काढून घेत असल्याने आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेअर बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. 30 शेअर्सच्या ब्लू चिप पंपनीतील इन्पहसिसमध्ये जवळपास 6 टक्के घसरण झाली. तर कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2.50 टक्के वाढ पाहायला मिळाली.

रुपयाची घसरगुंडी
जागतिक तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव 81.43 डॉलर प्रति बॅलरवर पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानी रुपया गटांगळ्या खात असून शुक्रवारी सुद्धा रुयपा 1 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत 86.62 वर बंद झाला. रुपया सतत घसरत असल्याने देशातील महागाई वाढत आहे. परदेशात जाणे, शिक्षण घेणे सुद्धा महागले आहे.