शेअर बाजारात अचानक भूकंप, सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ‘दिवाळे’, 9 लाख कोटी स्वाहा:

सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी शेअर बाजारात भूकंप पहायला मिळाला. बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1400 अकांनी घसरला, तर निफ्टीमध्येही 454 अंक खाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये अवघ्या काही मिनिटात स्वाहा झाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग झाले. मात्र तत्पूर्वी शुक्रवार, शनिवार, रविवारी शेअर बाजार बंद होता. त्यानंतर सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पडझड सुरू झाली. निफ्टी 24 हजारांच्याही खाली आला. 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असून फेडरल बँकेचेही निकाल लागणार आहेत. त्यामुळे बाजारात प्रचंड दबाव पहायला मिळतोय. त्याचाच परिणाम आज पहायला मिळाला आणि बाजारात पडझडीचे लाल निशाण फडकले.

बाजार कोसळल्याने बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचे भागभांडवल 448 लाख कोटींवरून 439 लाख कोटींवर आले आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना तब्बल 9 लाख कोटींचा फटका बसला आहे. तेल आणि गँस, मिडिया, रियल्टी, बँक, ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि पीएसयू बँकांचे शेअर जवळास 2 ते 5 टक्के पडले आहेत.

बाजारात भूकंप होण्याची कारणं?

  • 5 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत असून निकाल काय लागणार यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यामुळे बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला.
  • 7 नोव्हेंबर रोजी फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कची बैठक होत असून त्यानंतर नवीन व्याजदर ठरवले जातील. याचाही दबाव बाजारात दिसून आला.
  • मागणी कमी असल्याने ओपेक देशांनी डिसेंबरमध्ये तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय टाळला आहे. त्यामुळे तेलाचे दर वाढले असून RIL सारख्या शेअरवर याचा प्रभाव दिसून येत आहे.
  • दुसऱ्या तिमाहीमध्ये अनेक कंपन्यांचे रिझल्ट खराब आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला आहे.
  • एफपीआय अर्थात विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरू आहे. त्यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण दिसत आहे.

(शेअर, खऱेदी विक्री व बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)