शेअर बाजाराच्या ‘बुल रन’ ला मिळाले बळ! FII ची वापसी, पाच महिन्यात गमावले ते 6 दिवसात कमावले

गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात तेजी आहे. ही तेजी अशीच कायम राहील का आणि बाजाराची बुल रन वाढेल का, अशी शंका गुतंवणूकदारांना होती. त्यासाठी त्यांच्या नजरा सोमवारी बाजाराची वाटचाल कशी होते, याकडे लागल्या होत्या. सोमवारीही बाजारात तेजी असल्यास बाजाराला अधिक बळकटी मिळेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. आता सोमवारीही तेजी असल्याने बाजाराची घोडदौड सुरू होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

गेल्या आठवड्यातील तेजीने पाच दिवसात गुंतवणूकदारांनी 50 हजार कोटींची कमाई केली होती. गेल्या पाच महिन्यात बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे जे नुकसान झाले, त्यांनी जे गमावले ते फक्त तेजीच्या या सहा दिवसात कमावले आहे. तेजीच्या या सहा दिवसात गुंतवणूकदारांनी 25 लाख कोटी कमावले आहेत. बाजारात पुन्हा एकदा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) परतत असल्याने बाजारातील तेजीला बाळ मिळाले आहे. सुमारे 5 महिन्यांनंतर बाजारात आलेल्या तेजीने जगभरातील बाजारांना मागे टाकले आहे.

सोमवारी बीएसई सेन्सेक्स 1,078.88 अंकांनी उसळी घेत 77,984.38 वर बंद झाला. तर निफ्टी 323.55 अंकांनी वाढून 23,673.95 अंकांवर पोहोचला. गेल्या 6 दिवसात सेन्सेक्स तब्बल 4154 अंकांनी वर गेला आहे. बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांची चांगली कमाई झाली आहे.