
शेअर बाजारात सलग काही दिवस वाढ होत असताना गुरुवारी मात्र जबरदस्त ब्रेक लागला. आज सकाळी मार्केट उघडताच कोसळला तो दिवसभर सावरला नाही. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर 315 अंकांनी घसरून 79,801 अंकांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी घसरून 24,246 अंकांवर बंद झाला. कश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढल्याने आज मार्केटमध्ये घसरण झाल्याचे बोलले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. निफ्टी स्मॉल कॅप 250 आणि निफ्टी लार्ज कॅप 250 इंडेक्स आज तोटय़ात राहिले, तर निफ्टी ऑटो, आयटी आणि बँक इंडेक्समध्येही घसरण झाली. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज घसरण झाली. एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक, पीएनबी आणि युनियन बँकेतील शेअर्समध्येही घसरण झाली. बीएसईमधील एकूण 4086 शेअर्समध्ये व्यापार झाला.
गुंतवणूकदारांना 84 हजार कोटींचा फटका
बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन बुधवारी 429.63 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास 84 हजार कोटी रुपयांची घसरण झाली.