लाल, लाल, लाल…शेअर बाजार भूईसपाट, निफ्टी 1200, सेन्सेक्स 3900 अकांनी कोसळला; लाखो कोटी स्वाहा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर लादलेल्या आयात करामुळे मंदीची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी जोखीम घेण्यास नकार दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी भूईसपाट झाला आहे.

प्री मार्केटमध्ये निफ्टीत 1200, तर सेन्सेक्समध्ये 3900 अंकांची पडझड दिसत होती. मात्र बाजार सुरू झाल्यावर ही घसरण थोडी थांबली. निफ्टी 21, 758 आणि सेन्सेक्स 71, 985 वर ओपन झाला. यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झाले आहेत.

दरम्यान, हिंदुस्थानसह जपान, दक्षिण कोरियाचा बाजारही 8 टक्के कोसळला आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच एका दिवसात शेअर बाजारामध्ये एवढी घसरण झाली असून निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

सेन्सेक्समध्ये लिस्टेड 30 पैकी 30 शेअरमध्ये ‘ब्लड बाथ’ पहायला मिळाला. भारती एअरटेल 2.19 टक्के, आयसीआयसीआय 2.33 टक्के, अल्ट्रा सिमेंट 2.58 टक्के, एचडीएफसी बँक 3.14 टक्के, मारुती 3.23 टक्के, आयटीसी 3.56 टक्के, अॅक्सिस बँक 3.72 टक्के, टायटन 4.10 टक्के, आशियन पेंट 4.46 टक्के, पॉवरग्रीड 4.49 टक्के, एसबीआय 4.62 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर 4.65 टक्के, एल अँड टी 4.89 टक्के, रिलायन्स 6.62 टक्के, इन्फोसिस 7.04 टक्के, बजाज फायनाल्स 7.10 टक्के, टिसीएस 7.25 टक्के, एचसीएल 7.44 टक्के, कोटक बँक 8.11 टक्के, सनफार्मा 8.14 टक्के, टेक महिंद्रा 8.35 टक्के, बजाज फिनसर्व्ह 8.48 टक्के, एनटीपीसी 8.67 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 9.13 टक्के, अदानी पोर्ट 9.36 टक्के, इंडसइंड बँक 9.41 टक्के, टाटा स्टील 9.97 टक्के, झोमॅटो 9.99 टक्के आणि टाटा मोटर्समध्ये 9.99 टक्के घसरण झाली आहे.

हिंदुस्थानवर 26 टक्के आयात शुल्क

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमध्ये बोलताना जगभरातील देशांवर किती टक्के टॅरिफ लावला याची माहिती दिली. हिंदुस्थान अमेरिकन उद्पादनांवर 52 टक्के आयात शुल्क लावतो, त्यामुळे अमेरिका हिंदुस्थानी मालावर निम्मा अर्थात 26 टक्के आयात शुल्क लावणार आहे, असे ट्रम्प म्हणाले. तर चिनी मालावर 34 टक्के, युरोपियन युनियवर 20 टक्के, जपानवर 24 टक्के, तैवानवर 22 टक्के आणि इस्रायलवर 17 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली.