नववर्षाच्या सुरुवातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसल्याने शेअर बाजार पुन्हा मोठी झेप घेणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, बाजारात सातत्याने मोठी घसरण होत आहे. मंगळवारी बाजार तब्बल 1400 अंकांनी घसरला. बुधवारीही बाजारात मंदी होती. गेल्या 15 दिवसात परकीय गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 57000 कोटींचे नुकसान झाले आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात बाजार आणखी कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी बाजारात तरळता (लिक्विडीटी) वाढवायची आहे. त्यासाठी त्यांनी धोरणे आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्रम्प निवडून येताच नोव्हेंबरपासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली असून ते सर्व पैसा अमेरिकेत फेडलरकडे आणि तेथील शेअर बाजारात गुंतवत आहेत. त्यामुळे शेअर बाजार गडरडत आहे. परकीय गुंतवणूकदारांकडून अशी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू राहिल्यास भारतीय शेअर बाजारात आणखी गसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या महिन्यात सेन्सेक्स तब्बल 2300 अंकांनी तर निफ्टी 2.6 टक्क्यांनी घसरला आहे.
या घसरणीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) विक्रीची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी या महिन्यात भारतीय बाजारातून 50,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकासमर्थक धोरणांमुळे वॉल स्ट्रीटमध्ये लिक्विडिटी परत येऊ शकते. त्यामुळे परकीय संस्थामक गुंतवणूकदार भारतीय बाजारात आणखी विक्री करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये एफआयआयने तब्बल 57,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स विकले आहेत.
नुकतेच आलेले कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल फारसे उत्साहवर्धक नाहीत. यामुळे अनेक परदेशी कंपन्या आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, आरआयएलसारख्या बड्या कंपन्यांचे निकाल सकारात्मक असले तरी झोमॅटोच्या आकडेवारीवरून सुस्ती दिसून येते. त्यामुळे बहुतेक तज्ज्ञांना आणि विश्लेषकांना भारतीय शेअर बाजारात आणखी घसरणीची शक्यता वाटत आहे.
ट्रम्प यांची व्यापार धोरणं आणि फेडच्या व्याजदर कपातीच्या चक्राच्या गतीला आव्हान मिळू शकतं आणि बॉन्ड यील्ड वाढू शकतं. अमेरिकी बाजारात कमॉडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन फंडानं मजबूत अमेरिकी अर्थव्यवस्था, दीर्घकालीन उच्च व्याजदर आणि ट्रम्प यांच्या धोरणांवर गुंतवणूक करत जानेवारी 2016 नंतर डॉलर्सवर आपली लाँग पोझिशन कायम ठेवली आहे. वाढत्या डॉलरमुळे भारतीय रुपया जवळपास तीन टक्क्यांनी घसरून 86.70 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर होऊ शकतो. बाजारातील अशा अस्थिर परिस्थितीत गुंतवणुकदारांनी कमकुवत होल्डिंग्स सक्रियपणे कमी करणे गरजेचे आहे. ज्या होल्डिंग्समध्ये वाढीची क्षमता नाही, अशा होल्डिंग्समधून बाहेर पडण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.