आर्यन सकपाळच्या 101 चेंडूंतील 170 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर शारदाश्रम विद्यामंदिरने कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेचा 318 धावांनी धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच सर सी.जे. हायस्कूल, जमनाबाई नरसी, नॅशनल इंग्लिश स्कूल या संघांनीही 128 व्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
आज मुंबईच्या विविध मैदानांवर झालेल्या सामन्यात एकेकाळी मुंबईचे शालेय क्रिकेट गाजवणाऱ्या शारदाश्रमने आर्यन सकपाळच्या 170, खूश पाटीलच्या 34 चेंडूंतील 74 आणि रुद्र कुलावडेच्या 55 धावांमुळे 7 बाद 470 अशी मोठी धावसंख्या उभारली. पण शारदाश्रमचे हे आव्हान स्वामी विवेकानंदला झेपलेच नाही. शुभम वरपे आणि स्वराज शेवाळे यांनी स्वामी विवेकानंदचा डाव 142 धावांतच गुंडाळला आणि शारदाश्रमने 318 धावांचा महाविजय मिळवला. तसेच जमनाबाई नरसी हायस्कूलने आर्य गुरुकुलचा 374 धावांनी पराभव केला. निल डागाच्या 169 धावांच्या जोरावर नरसीने 4 बाद 425 धावा केल्या होत्या, तर आर्य गुरुकुलचा डाव अवघ्या 51 धावांतच आटोपला. सर सी.जे. हायस्कूलने खेतान शाळेचा 9 विकेटनी धुव्वा उडवला. तर नॅशनल इंग्लिश हायस्कूलने 498 धावा केल्या तर ज्ञान पेंद्र शाळेचा अवघ्या 61 धावांत फडशा पाडला गेला.