लिंगबदल करून सरिता झाली शरद अन् सविताशी लग्न केलं; आता घरात पाळणा हलला, फोटो व्हायरल

उत्तर प्रदेशमधील शहाजहापूर येथे दोन वर्षापूर्वी सरिता नावाच्या महिलेने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर सरिताने शरद सिंह असे नाव धारण करत सविता नावाच्या महिलेशी लग्न केले होते. आता शरदच्या घरामध्ये पाळणा हलला असून त्याची पत्नी सविताने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या सरिताचे बीएडपर्यंत शिक्षण झाले असून 2020 मध्ये तिने शिक्षक पात्रता परीक्षा दिली होती. ही परीक्षा पास झाल्यानंतर सरिताला सहाय्यक अध्यापक पदावर नोकरी मिळाली होती. भावलखेडा येथील एका विद्यालयामध्ये ती तैनात होती. त्यानंतर तिने लिंगबदल करण्याचा निर्णय घेतला आणि 2022 मध्ये शस्त्रक्रिया करून घेतली.

इंदूरमध्ये लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर सरिताने लखनऊमध्ये हार्मोन थेरपीही घेतली. यानंतर सरिताच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा आल्या आणि तिचा आवाजही पुरुषी झाली. यानंतर तिने शरद सिंह नाव धारण केले आणि प्रशासनानेही तिला ‘पुरुष’ प्रमाणपत्र दिले. शरदने 23 नोव्हेंबर 2023 मध्ये पीलीभीत येथील सविता सिंह हिच्याशी लग्न केले.

लग्नाच्या दीड वर्षानंतर आता शरद आणि सविताच्या घरामध्ये पाळणा हलला आहे. बुधवारी सकाळी प्रसुती वेदना होऊ लागल्याने सविता सिंह हिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.


माझ्या पत्नीने 10-15 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले आहे. माझ्या कुटुंबामध्ये 26 वर्षानंतर मुलाचा जन्म झाला आहे. प्रत्येकाला संतती सुख हवे असते आणि ज्या परिस्थितीतून हे सुख मला मिळाले आहे याचा आनंद शब्दातही व्यक्त करू शकत नाही, असे शरदने सांगितले.