
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे आज अल्पशः आजाराने निधन झाले. धुवाळी हे गेली 53 वर्षे शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. धुवाळी यांच्या निधनाने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख होतेय अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
तुकाराम धुवाळी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रे पूर्व, एमआयजी वसाहतीमधील जेड गार्डन इमारतीतील जी विंग, 402 या निवासस्थानी उद्या सकाळी 11 वाजता ठेवण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना कळवले आहे.
अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, निगर्वी तसेच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱयाचं देहावसान झालं, याचं मला आत्यंतिक दुःख होतंय, अशा भावना शरद पवार यांनी धुवाळी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या.