राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ते बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग आणि परभणीच्या दौऱ्यावर होते. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. पण काही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी शरद पवार हे बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग व परभणीच्या दौऱ्यावर होते. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यानंतर शरद पवार हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी परभणीला निघाले होते. यावेळी शरद पवारांची कार पुढे गेल्यावर ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेने अचानक ब्रेक दाबल्यामुळे रुग्णवाहिकेच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यात एका कारमध्ये शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बसले होते. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
या अपघाताचा सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. शरद पवारांचा ताफा बीडहून परभणीच्या दिशेनं जात असताना रस्त्याच्या बाजुला उभ्या असल्याने एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या अपघाताचा व्हिडीओ कैद केला आहे. हा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.