महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमधील विहीरी कोरड्या ठाक पडल्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने मात्र विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एक इशारा दिला आहे.
”मी मागील महिन्यात दिनांक 24 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतू या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, नगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते. आजमितीस ती संख्या 11 हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते”, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
हे पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर करत त्यासोबत राज्य सरकारला इशारा दिला आहे. ”राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, अशी पोस्ट शरद पवार यांनी शेअर केली आहे.