पुणे येथील चाकण बाजार समितीमध्ये शुक्रवारी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ एकाच मंचावर आले होते. सोहळ्यासाठी शरद पवार यांनी आधी हजेरी लावली होती. भुजबळ यांनी यायला उशीर केला. त्यांची वाट पाहत शरद पवार जवळपास दीड तास व्यासपीठावर थांबले.
सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार होते, तर भुजबळ हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे दोघे एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसले. सुरुवातीची 20 मिनिटे एकमेकांशी संवाद न साधलेल्या या नेत्यांमध्ये नंतर काही सेपंदापुरता संवाद झाला. शरद पवार यांनी भुजबळांच्या हातातील पत्रिका काढून घेतली अन् स्वतःच्या हातातील पत्रिका त्यांच्या हातात सोपवली. त्या पत्रिकेतील संदेश वाचल्यानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच दोघे नेते एकाच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसले होते. त्यामुळे त्यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
भुजबळ-फडणवीस यांचा एकाच गाडीतून प्रवास
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्याकडे आठ ते दहा दिवसांचा वेळ मागितला होता. परदेशातून परतल्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा भुजबळ आणि फडणवीस यांची भेट झाली. दोघांनी एकाच गाडीतून तब्बल 50 मिनिटे प्रवास केला. या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
- भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली? असे पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला पुढे कसे नेता येईल, ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचे काम केले ते विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचवता येतील, समतायुक्त समाज, भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल? हीच आमची चर्चा झाली. याव्यतिरिक्त कुठलीही चर्चा आमची झालेली नाही, असे फडणवीस म्हणाले.