उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 70 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच क्लीन चिट देण्यात आली. यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थकाचा कारखाना शिखर बँकेकडून सील करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.
शरद पवार यांचे समर्थक अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील साखरेचा साठा शिखर बँकेने जप्त केला आहे. ही कारवाई केल्यानंतर शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. शिखर बँकेचे 450 ते 500 कोटींचे कर्ज साखर कारखान्यावर आहे. हे कर्ज आधीच्या संचालकांनी काढले होते. हे कर्ज फेडले नसल्याने बँकेने कारवाई सुरू केली होती. या कारवाईवर अभिजीत पाटील यांनी स्थगिती मिळवली होती. पण ही स्थगिती संपताच आज बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. विशेष म्हणजे ही कारवाई सुरू असताना अभिजीत पाटील हे करमाळ्यात शरद पवार यांच्या सभेत होते.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी करमाळा तालुक्यात शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अभिजीत पाटीलही उपस्थित होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई सुरू झाल्याचे रोहित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. यानंतर अभिजीत पाटील हे तातडीने पंढरपूरला रवाना झाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संध्याकाळी शरद पवार यांची सभा होणार आहे.
राजकीय सूडातून कारवाई!
भाजपला रामराम करत मोहिते पाटील हे पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. आता माढात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी अभिजीत पाटील हे मैदानात उतरले आहेत. यामुळे राजकीय सूड भावनेतून अभिजीत पाटील यांच्यावर कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.