‘मविआ’चे 31 खासदार माझ्या शेतकऱ्यांसाठी प्रयत्नांची शिकस्त करतील; शरद पवार यांचा मोदी सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे लोकसभेतील खासदार हे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील, असे शरद पवार म्हणाले. नगर जिल्ह्यातील अकोले येथील बाजारतळावर लोकनेते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

लोकसभेत पाठविलेले ‘मविआ’चे 31 खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आपल्या प्रयत्नांची शिकस्त करतील, हा विश्वास मी जनतेला देतो. आजपासून 70 दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. निश्चितच महाराष्ट्रात सर्वसामान्य माणूस व गोरगरीब शेतकऱ्यांसह आयाबहीणींची सत्ता येईल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे आल्यावर लोकांना काय दिसले, तर आपल्याच शेतीत उत्पादित शेतीमालाला योग्य किंमत मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांना हेच दाखवून दिले, अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी केली.

शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थान साथी दशरथ सावंत यांनी भूषविले. यावेळी खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॅा. सुधीर तांबे, माकपचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे, काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले, श्रीमती सुनिता भांगरे, अमित भांगरे, कॉम्रेड डॅा. अजित नवले, महेश नवले, विनोद हांडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुरेश गडाख यांनी केले. मेळाव्यात अशोक बाबर, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, दिलीप भांगरे, जयश्री थोरात, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्ते व बहुसंख्य महीला, युवक उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारमधील राज्यकर्त्यांना शेती व शेतकरी यांच्याविषयी अस्थाच नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव ठरवून शेतमालाची किंमत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. पण या सरकारकडून ते होत नाही. शेतीला जोडधंद्या म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय सुरू केले. दूध व कांद्यासह शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला रास्त किंमत मिळाली पाहीजे. पण शेतमालाला हमीभाव देण्याची तयारी या सरकारची नाही. मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून पाठविले. त्यात नगर जिल्ह्यातून दोन्ही जागांवर ‘मविआ’चे खासदार निवडणूक दिले. केंद्रातील सरकारकडून माझ्या शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक होणार नसेल तर निश्चितपणे पाठवलेले खासदार न्याय मिळवून देतील, असे शरद पवार यांनी ठणकावले.

अकोले हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल अतिवृष्टीचा तालुका आहे. महाराष्ट्रातील एके काळच्या दुष्काळी भागाला हक्काचे पाणी देण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण भूमिका घेणारा अकोले तालुका आहे. या तालुक्यात लोकांच्या हिताची जपवणूक करणारे नेतृत्व जन्मला आले, यांच्यामध्ये यशवंतराव भांगरेचे नाव घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी जेव्हा पहिल्यांदाच गेलो तेव्हा लोकांचे व आदिवासींचे प्रश्न प्रामाणिकपणाणे मांडणारे जे विधानसभेचे सदस्य होते त्यामध्ये यशवंतराव भांगरेचा उल्लेख हा करावाच लागेल. तत्कालीन आमदार यशवंतराव भांगरे यांनी विधानसभेत आदिवासी भागांचे प्रश्न मांडले. यशवंतराव यांच्यानंतर अशोक भांगरे यांनीही तोच विचार पुढे नेण्याचे काम केले. नंतरच्या काळात ही जबाबदारी अशोक भांगरे यांनी घेतली, असे शरद पवार म्हणाले.

दुर्देवाने नियतीच्या मनात काही वेगळेच होते व तुमच्या आमच्यातून ते लवकर निघून गेले. मात्र त्यांचा विचार हा होता की, नवीन पीढी तयार करायची व या पिढीमार्फत अकोले तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील, याची खबरदारी घ्यायची. आणि त्या संबंधीची अस्था त्यांच्या बोलण्यातून होती. अशोक भांगरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस डोळ्यात पाणी आणून माझ्या मुलावर लक्ष ठेवा. म्हणत केवळ माझ्या शब्दाखातर तेव्हा निवडणुकीतून माघार घेतली व राष्ट्रवादीचा उमेदवार मताधिक्याने निवडून आणला. अशोक भांगरे यांना दिलेला तो शब्द आपल्याला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत खरा करून दाखवायचा आहे व अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट करून स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या 61 व्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अमित भांगरे यांना आपल्या पक्षाकडून संभाव्य उमेदवारीचा हिरवा कंदिल दाखविल्यावर मेळाव्यातील उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोल्यातील विद्यमान आमदार डॅा. किरण लहामटे यांचा नामोल्लेख टाळत शरद पवार यांनी टिकास्त्र सोडले. मला वाटलं साधा माणूस आहे, जनतेची साथ सोडणार नाही. माझ्या शब्दाखातर तुम्ही डॉक्टरला निवडून दिले, ती माझी चूक झाली. सुरुवातीला त्याने इथं भाषण केलं, मी शरद पवारांना कधी सोडणार नाही. नंतर मुंबई गेला व तिकडे जाऊन बसला. ज्याला बसायचं कुठ ते कळत नाही, त्याला योग्य ठिकाणी तुम्ही बसवा, असे आवाहन शरद पवार यांनी अकोल्याच्या जनतेला केले.