पुण्यात आज झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी गेल्या 10 वर्षांत जनतेची फसवणूक केली, अशी सडकून टीका शरद पवार यांनी केली. तसेच सत्तेचा उन्माद काय असतो तो, आताच्या राज्यकर्त्यांनी दाखवून दिला, असे म्हणत शरद पवार यांनी घणाघात केला.
पुण्यात महाविकास आघाडीची भव्य सभा झाली. महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार काँग्रेसचे रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यावेळी उपस्थित होते. तसेच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेच्या (बाळासाहेब उद्धव ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारे याही या सभेला उपस्थित होत्या.
मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांची क्लिनिंग मशीन, शरद पवारांचा घणाघात
‘पेट्रोलचा दर 71 रुपये प्रतिलिटर होता. त्यावेळी दर कमी करणार, असे मोदींनी म्हटले होते. 2014 मध्ये त्यांनी हे आश्वासन दिले होते. आज 3650 दिवस उलटले. आता पेट्रोलचा दर 106 रुपये प्रतिलिटर झाला आहे. घरगुती गॅसचा दर 410 रुपये एका सिलिंडरला आहे. तो कमी करणार, असे आश्वासन मोदींनी दिले होते. आता सिलिंडर 1060 रुपयांना आहे. तरुण मुलांना रोजगार देणार, असे तिसरे आश्वासन मोदींनी दिले होते. दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार, असे मोदी म्हणाले होते. पण गेल्या 10 वर्षांत नोकऱ्या कमी झाल्या. आज हिंदुस्थानातील तरुणांपैकी 86 टक्के तरुण हे बेरोजगार आहेत. अशा अनेक गोष्टी सांगता येतील’, असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
‘शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि कृती उलटी करायची. हीच जर मोदींची नीती असेल तर, त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर झारखंडचं आहे. झारखंडमध्ये आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. मोदींवर टीका केली म्हणून आदिवासी मुख्यमंत्र्याला झारखंडच्या तुरुंगात टाकलं गेलं. गेली सहा महिने मुख्यमंत्री तुरुंगात आहे’, असे सांगत शरद पवार यांनी मोदी सरकारचा बुरखा टराटरा फाडला.
शरद पवार यांनी आणखी उदाहरणं दिली. ‘देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे अतिशय उत्तम प्रशासक आहेत. शाळा, हॉस्पिटल काढले. नागरीकांना चांगल्या आणि अधिकाधिक सुविधा दिल्या. भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं. पण केवळ मोदींवर टीका केली म्हणून आज अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. त्यांचे चार मंत्रीही तुरुंगात आहेत’, असे शरद पवार म्हणाले.
‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधा केला. त्यांचे तीन मंत्री आणि आमदार आज तुरुंगात आहेत. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी असते. लोकशाही जगवण्यासाठी असते. पण लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार करत असेल तर, या निवडणुकीत मोदींचा आणि त्यांच्या विचारांचा शंभर टक्के पराभव करण्याचं काम उद्याच्या निकालातून करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.