
चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांनी स्वतःचा राजकीय अनुभव लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे होते, अशी स्पष्ट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यासंदर्भात बोलले ते शंभर टक्के बरोबर बोलले, असे सांगतानाच शरद पवार यांनी यावेळी नीलम गोऱ्हे यांची कुंडलीच मांडली. गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या हे महाराष्ट्रातील सर्वांनाच माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना मिंधे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेवर राजकीय चिखलफेक केली. शिवसेनेत दोन मर्सिडीज गाडय़ा दिल्यानंतर एक पद मिळते असे त्या म्हणाल्या होत्या. त्यावरून त्यांचा तीव्र निषेध होत आहे. गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांनी माफी मागायला हवी असे सांगतानाच, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांनाही सवाल उपस्थित केले होते. शरद पवार यांनी आज सिल्व्हर ओक निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीजच्या आरोपावरून प्रसारमाध्यमांनी यावेळी शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. शरद पवार म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांची विधिमंडळात प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून एण्ट्री झाली. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या. नंतर कदाचित त्या काँग्रेसमध्ये होत्या. त्यानंतर शिवसेनेत गेल्या आणि आता त्या एकनाथ शिंदेंच्या गटात काम करत आहेत. एवढय़ा मर्यादित कालावधीत त्यांनी चार पक्ष बदलले. स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असे भाष्य करायला नको होते.
संमेलनाध्यक्षांची भूमिका पटली
संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केलेल्या भाषणाचे यावेळी शरद पवार यांनी काwतुक केले. त्या अतिशय चांगल्या बोलल्या, त्यांनी समाजाला एक दिशा दिली. त्यांचे बोलणे मला पटले असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणात सत्ताधाऱयांबद्दलही भाष्य केले होते असे पत्रकारांनी विचारले असता, संमेलनाध्यक्षांनी आमच्यासमोर मर्यादित भाषण केले आणि नंतर त्यांनी सविस्तर केले, असे पवार म्हणाले.
आत्मसन्मान असलेली व्यक्ती आरोपानंतर पदावर राहत नाही
मस्साजोगमधील लोकांच्या भावनांची तीव्रता पाहिली तर ज्याला आत्मसन्मान आहे अशी व्यक्ती पदावर राहणार नाही, असा टोला पवार यांनी लगावला. यापूर्वी असे आरोप झाले तेव्हा अनेकांनी राजीनामा दिला होता याचीही आठवण त्यांनी करून दिली. नैतिकतेच्या आधारावर मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता अशी विचारणा होताच, नैतिकता आणि या लोकांचा संबंध आहे असे आपल्याला जाणवत नाही, अशी टीका पवार यांनी अजित पवार गटावर केली.
हलके मे मत लेलो… मराठीत हा शब्द नाही
मला हलक्यात घेऊ नका असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते. हिंदी प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनी त्याबाबत प्रश्न विचारताना ‘हलके में मत लो’ असे वाक्य वापरले. त्यावर शरद पवार यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. ‘हलके में मत लेलो हे काय प्रकरण आहे? मला मराठी जेवढं कळतंय त्यात हा शब्द नाही, असे ते म्हणाले.
मराठीच्या उत्सवात राजकारण नको
साहित्य महामंडळाने माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता, त्यावर आपण महामंडळाचे पदाधिकारी किंवा सदस्य नसल्याने महामंडळाच्या वतीने काहीही बोलू शकत नाही असे पवार यांनी स्पष्ट केले. साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर माफी मागितली आहे. त्यामुळे यावर पडदा टाका असे आपण म्हटल्याचेही शरद पवार म्हणाले. चिपळूण, नाशिक, उदगीर, पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येक संमेलनात आपण व्यासपीठावर होतो. हा महाराष्ट्रातील मराठीचा उत्सव आहे आणि तो कोणतेही राजकारण न आणता सर्व मिळून साजरा केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळाव्यात – फडणवीस
नीलम गोऱहे यांच्या विधानाबाबत विचारले असता, ‘‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बोलताना प्रत्येकानेच मर्यादा ठेवल्या पाहिजेत,’’ असे खडेबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. विशेषतः जे साहित्यिक आहेत त्यांना वारंवार असे वाटते की, राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत. तसे ते बोलतातही. मग त्यांनीदेखील पार्टी लाईनवरच्या कमेंट्स करणे योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात, असे फडणवीस पुढे म्हणाले.
माझ्यावर जबाबदारी टाका, आक्षेप नाही
नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती, असे शरद पवार म्हणाले. मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे संजय राऊत यांना गोऱ्हेंच्या वक्तव्याची जबाबदारी माझ्यावर टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही, पण साहित्य संमेलनाचा वापर राजकारणासाठी होतोय हे मात्र खरे नाही, असे शरद पवार पुढे म्हणाले.
गोऱ्हेबाईंचे काळे कारनामे
लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात – संजय राऊत
उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारायला देण्यासाठी किती पैसे घेतात, याची माहिती माझ्याकडे आहे. या सगळय़ाचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.
भ्रष्टाचार दडपण्यासाठी 25 लाख मागितले हेते – नितीन देशमुख
अकोला पालिकेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न विधान परिषदेत स्थानिक आमदाराने उपस्थित केला होता. हे प्रकरण दडपण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्यामार्फत संबंधितांकडे 25 लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला.
विधानसभा उमेदवारीसाठी पैसे घेतले – विनायक पांडे
नीलम गोऱ्हे या पैशांशिवाय कार्यकर्त्यांना न्याय देत नव्हत्या. विधानसभेची उमेदवारी देण्याचे कबूल करून त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते, असा आरोप शिवसेनेचे राज्य संघटक विनायक पांडे यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन हा सगळा प्रकार महाराष्ट्रासमोर आणीन, असे ते म्हणाले.